India Win T20 World Cup : ‘या’ सात खेळाडूंनी मिळवून दिला भारताला टी-२० विश्वचषक

India Win T20 World Cup : सातत्यपूर्ण कामगिरी आणि निर्विवाद वर्चस्व हे भारतीय विजयाचं वैशिष्ट्य ठरलं.

102
India Win T20 World Cup : ‘या’ सात खेळाडूंनी मिळवून दिला भारताला टी-२० विश्वचषक
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपला दुसरा टी-२० विश्वचषक शनिवारी जिंकला. आयसीसी स्पर्धेचा ११ वर्षांचा आणि विश्वचषक विजेतेपदाचा १३ वर्षांचा दुष्काळ त्यामुळे संपला. प्रत्येक आव्हानाला पुरून उरणारा जिगरबाज खेळ करत भारतीय संघाने ही विश्वविजेती कामगिरी केली. भारताला विजयापर्यंत नेणारे आणि स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारे ७ खेळाडू कुठले ते पाहूया, (India Win T20 World Cup)

रोहित शर्मा

संघाचा कर्णधार म्हणून तर त्याच योगदान होतंच. शिवाय विराट कोहली अपयशी ठरत असताना दमदार सुरुवातीची जबाबदारी रोहितने आपल्या खांद्यावर घेतली. संपूर्ण स्पर्धेत १५६ च्या स्ट्राईकरेटने त्याने २५७ धावा केल्या. शिवाय एकदिवसीय विश्वचषकातील पराभवानंतर संघ बांधणीही केली. या स्पर्धेत त्याने १५ षटकार आणि २६ चौकार ठोकले. (India Win T20 World Cup)

सूर्यकुमार यादव

टी-२० क्रिकेटमधील तो सर्वोत्तम फलंदाज आहे. अमेरिका आणि इंग्लंड विरुद्धची त्याची खेळी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची होती. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३१ धावा संघाची धावसंख्या २०० पार नेणाऱ्या होत्या. अफगाणिस्तान विरुद्ध त्याने २८ चेंडूंत ५३ धावा केल्या. पण, या सगळ्यावर कडी म्हणजे अंतिम सामन्यातील डेव्हिड मिलरचा पकडलेला झेल. सीमारेषेवर शरीराचा तोल सांभाळत त्याने मिलरचा अडवलेला षटकार आणि त्याचं झेलाच केलेलं रुपांतरण हे एका पिढीत एकदाच घडणाऱ्या तमत्कारापेक्षा कमी नव्हतं. आपल्या ६० टक्के धावा त्याने चौकार आणि षटकारानेच कमावल्या. (India Win T20 World Cup)

हार्दिक पांड्या

एकदिवसीय विश्वचषकात पायाला झालेली दुखापत आणि त्यानंतर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून केलेली खराब कामगिरी, झालेली हेटाळणी हा सगळा कलंक पुसून टाकणारी जबाबदार कामगिरी हार्दिकने केली. ३० वर्षीय अष्टपैलू खेळाडूने ११ बळी मिळवले आणि १५१ च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या. पाचव्या क्रमांकावरील खेळाडूकडून आणखी काय पाहिजे? अंतिम सामन्यात त्याने २० धावांत ३ बळी मिळवले. (India Win T20 World Cup)

अक्षर पटेल

अष्टपैलू गुणांमुळे यजुवेंद्र चहलच्या पुढे त्याची संघात निवड झाली. पण, ही संधी त्याने अगदी सार्थ ठरवली. संघ प्रशासनाने कधी तिसऱ्या, कधी चौथ्या तर कधी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. पण, अक्षरने आपला ठसा उमटवलाच. इंग्लंड विरुद्धच्या २३ धावांत ३ बळी असोत किंवा अंतिम फेरीत विराटबरोबर केलेली भागिदारी आणि ४७ धावा असोत, त्याने आपली भूमिका १०० टक्के निभावली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीमारेषेवर मिचेल मार्शचा घेतलेला एकहाती झेल कोण विसरेल? (India Win T20 World Cup)

(हेही वाचा – Rahul Dravid : ‘मी पुढील आठवड्यापासून बेरोजगार आहे,’ – राहुल द्रविड)

कुलदीप यादव

अमेरिकेतील सामन्यांत त्याला संधी मिळाली नाही. पण, वेस्ट इंडिजमध्ये त्याच्या शिवाय संघाला गत्यंतर नव्हतं. पॉवर प्ले संपला की, कुलदीपचा खेळ सुरू व्हायचा आणि आपल्या पहिल्या किंवा दुसऱ्या षटकांत त्याने कर्णधार रोहितला हमखास बळी मिळवून दिला. एक अंतिम सामना सोडला तर सगळं काही त्याच्याकडून बरोबरच घडलं. इंग्लंड विरुद्ध हॅऱी क्रूकला त्याने बाद केलं तो बळी विश्वचषकातील सर्वोत्तम बळींपैकी एक ठरेल. (India Win T20 World Cup)

जसप्रीत बुमरा

जसप्रीत बुमराची खेळपट्टीची समज आणि त्याप्रमाणे चेंडूची गती आणि टप्पा यात बदल करण्याची हातोटी यासाठी तो जाणकारांच्या सदैव लक्षात राहील. आणि चाहत्यांच्या लक्षात राहील त्याच्या बळी मिळवण्याच्या कौशल्यामुळे. या घडीला गोलंदाज समोरून धावून येत असताना फलंदाजांना धडकी भरवेल असा सर्वोत्तम गोलंदाज क्रिकेटमध्ये आहे, तो म्हणजे जसप्रीत बुमरा. अचूक माऱ्यामुळे अख्ख्या स्पर्धेत त्याची षटकामागे धावगती होती अवघी ४.१७. टी२० विश्वचषक स्पर्धेतील हा विक्रम आहे. (India Win T20 World Cup)

अर्शदीप सिंग

बुमराला या विश्वचषकात एक योग्य जोडीदार मिळाला तो अर्शदीपच्या रुपाने. चेंडू स्विंग करण्याच्या क्षमतेमुळे त्याची सिराजच्या पुढे संघात निवड झाली. आणि हा विश्वास त्याने अगदी शेवटपर्यंत सार्थ ठरवला. गोलंदाजी करताना अनेक कसोटीचे क्षण आले. पण, २५ वर्षीय अर्शदीप पुरून उरला. त्याने १७ बळीही मिळवले. (India Win T20 World Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.