नागपुरमधील जामठा स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली आहे. सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाबाद 46 धावांची दमदार खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. तसेच दिनेश कार्तिकने दोन चेंडूत 10 धावा करत भारताचा विजय निश्चित केला. पावसामुळे 8 षटकांच्या झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 91 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे भारताने 4 गडी गमावत 7.2 षटकात पूर्ण करत सामना 6 विकेट्सने जिंकला आहे.
भारताचा विजय
ऑस्ट्रेलियाचे 91 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या भारताने हेजवलूडच्या पहिल्याच षटकात 20 धावा घेतल्या. सलामीवीर रोहित शर्माने दोन तर केएल राहुलने एक षटकार मारला. पॉवर प्लेचे दुसरे षटक टाकणाऱ्या पॅट कमिन्सच्या षटकात राहुल आणि रोहितने 10 धावा करत पॉवर प्लेमध्ये 30 धावा घेतल्या. मात्र, त्यानंतर झॅम्पाने भारताला पहिला धक्का दिला. त्याने 10 धावा करणाऱ्या केएल राहुलला बाद केले. यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीच्या साथीने 3.5 षटकातच भारताचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र झाम्पाने पाचव्या षटकात विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव असे पाठोपाठ दोन विकेट घेतले. झॅम्पाने पाचव्या षटकात फक्त 7 धावा दिल्याने भारताच्या 3 बाद 58 धावा झाल्या.
भारताला विजयासाठी 18 चेंडूत 33 धावांची गरज होती. रोहित शर्माने सहाव्या षटकात 11 धावा केल्या. त्यामुळे हे टार्गेट 11 चेंडूत 22 धावा असे आले. दिनेश कार्तिकने शेवटच्या ओव्हरमध्ये दोन चेंडूत १० धावा करत भारताचा विजय निश्चित केला. हा सामना जिंकत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे.
Join Our WhatsApp Community