भारतीय क्रिकेटपटूंना विदेशी लीगसाठी परवानगी नाहीच

165

भारतीय क्रिकेटपटूंना कुठल्याच विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी मान्यता दिली जाणार नाही, असे इंडियन प्रिमियर लीगचे नवीन चेअरमन अरुण धुमल यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. सोबतच आयपीएल ही लवकरच जगातील सगळ्यात मोठी लीग बनणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सध्या जगभरात टी-20 लीग प्रकाराला पेव फुटले असून प्रत्येक क्रिकेट खेळणारा देश स्वत:ची लीग आयोजित करण्याच्या विचारात आहे. अशात बीसीसीआयवर भारतीय खेळाडूंना विदेशी लीगसाठी मान्यता देण्याबाबत दडपण वाढते आहे. कारण इतर देशांतील खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होत असतात. मात्र, त्याच खेळाडूंच्या देशामध्ये होणा-या लीग क्रिकेटमध्ये सहभागी होण्यास भारतीय क्रिकेटपटूंना मज्जाव केला जातो.

यातच खेळाडूंचेही हित आहे

दक्षिण आफ्रिकेतसुद्धा लवकरच टी-20 लीग पार पडणार आहे. त्यात आयपीएलमधल्या अनेक दिग्गज फ्रॅंचायझींनी संघ विकत घेतलेले आहेत. तरीसुद्धा तिथेही भारतीय खेळाडूंना सहभागी होण्यास बीसीसीआयने परवानगी दिली नाही. याबाबत बोलताना धुमल म्हणाले की, सध्यातरी विदेशी लीगसाठी भारतीय क्रिकेटपटूंना मान्यता देण्याविषयी आमचा कुठलाही विचार नाही. बीसीसीआयकडून पूर्ण विचारांतीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यातच खेळाडूंचेही हित आहे. करारबद्ध नसलेल्या खेळाडूंनाही खासगी लीगपेक्षा भारताकडून खेळण्याची जास्त इच्छा आहे, असे धुमल म्हणाले.

( हेही वाचा: T-20 World Cup: चार टॉप संघ आणि फ्लॉप कर्णधार! )

दहापेक्षा जास्त संघ नाही

धुमल म्हणाले, सध्यातरी अजून कुठलेही नवीन संघ आयपीएलमध्ये समाविष्ट करण्याचा आमचा विचार नाही. कारण संघ वाढवले, तर एकाच वेळी संपूर्ण स्पर्धा खेळवण्यावर बंधने येतील. आगामी दोन सत्रांमध्ये 74 सामने आयोजित करण्याचा आमचा विचार आहे. त्यानंतर 84 सामने आणि गोष्टी अनुकूल राहिल्या तर एकूण 94 सामने एका सत्रात खेळवण्याचा आमचा मानस आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.