Ind Vs WI T20I : भारतीय क्रिकेटपटू वेस्ट इंडिजमध्ये ‘या’ गोष्टीची करतायत तक्रार

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे

161
Ind Vs WI T20I : भारतीय क्रिकेटपटू वेस्ट इंडिजमध्ये ‘या’ गोष्टीची करतायत तक्रार
Ind Vs WI T20I : भारतीय क्रिकेटपटू वेस्ट इंडिजमध्ये ‘या’ गोष्टीची करतायत तक्रार
  • ऋजुता लुकतुके

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय खेळाडूंनी तिथल्या एका गोष्टीबद्ल नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी हार्दिक पांड्याने आपलं परखड मत मांडलं होतं. आता रविचंद्रन अश्विननेही याविषयी उघड मत व्यक्त केलं आहे. भारतीय खेळाडूंना नेमकं काय खटकतंय. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. आणि कसोटी तसंच एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टी-२० मालिकेत मात्र संघ १-२ असा पिछाडीवर आहे. एरवी वेस्ट इंडिजला क्रिकेटची मोठी परंपरा आहे. आणि व्हिव रिर्चर्ड्स आणि गॉर्डन ग्रिनिजच्या जमान्यातला विंडिज संघ हा जगजेत्ता म्हणूनच ओळखला जायचा.

विंडिज दौराही सगळ्यात खडतर मानला जायचा. पण, यावेळी विंडिज दौऱ्यावर गेलेले भारतीय क्रिकेटर तिथल्या क्रिकेटवर खुश असले तरी एका गोष्टीवर नाराज आहेत. आणि त्याविषयी उघडपणे ते राग व्यक्त करत आहेत. रविचंद्रन अश्विननेही आपल्या यूट्यूब वाहिनीवर वेस्ट इंडिजमधील क्रिकेट या विषयावर नुकताच एक कार्यक्रम केला. आणि यात त्याने क्रिकेटच्या पायाभूत सुविधाच ढासळल्याचं मत व्यक्त केलं आहे. या व्हिडिओची युट्यूब लिंक इथं देत आहोत.

https://www.youtube.com/watch?v=BsbqZVTLeCI&t=31s

या व्हिडिओत अश्विन म्हणतो, ‘आम्ही कसोटी सामन्यासाठी पोहोचलो तेव्हा सरावासाठी दिलेल्या सुविधा अगदीच साधारण होत्या. आम्ही सराव करत असलेल्या नेट्सवर जराही गवत नव्हतं. एखाद्या कॉलेजची खेळपट्टी याहून चांगली असेल. खेळासाठी पायाभूत सुविधा मिळाल्या नाहीत तर खेळ बहरणार कसा?’ आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या सुविधा अशा असतील तर प्रथमश्रेणी आणि देशांतर्गत क्रिकेटचं काय असेल असा प्रश्न अश्विनला पडलाय. त्याविषयी आपली स्थानिक भाषा तामिळमध्ये तो म्हणतो, ‘क्रिकेट हा खेळ कौशल्य विकासाचा आहे इथं लहान मुलांना चांगल्या सुविधा मिळाल्या नाहीत, खेळायला खेळपट्ट्या मिळाल्या नाहीत. तर नवीन खेळाडूच तयार होणार नाहीत. १० वर्षांखालील गटापासून चांगली मैदानं मिळाली पाहिजेत. विंडिज क्रिकेटची अवस्था का वाईट आहे हे इथं येऊन कळलं.’  पुढे जाऊन अश्विन असंही म्हणतो की, याहून चांगलं क्रिकेटला पोषक वातावरण मिळणं हा विंडिज क्रिकेटरचा हक्क आहे.

(हेही वाचा – ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होताच गेस्ट्रॉऐवजी मलेरियाने डोके काढले वर)

पहिल्या टी-२० सामन्यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्यानेही क्रिकेटविषयक सुविधा तसंच ड्रेसिंग रुमच्या अवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली होती. अश्विनच्या वाहिनीचे १२ लाख सब्सक्राइबर आहेत. आणि त्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एक लाखांहून जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. एक प्रेक्षक किकी म्हणतो, ‘वेस्ट इंडिज संघाची कामगिरी खालावलीय याविषयी सगळे बोलतात. पण, अखेरीस कुणीतरी ती खालावली याविषयी बोलण्याचं धाडस करत आहे.’ तर श्रिनी म्हणतो, ‘अशा अवस्थेतही विंडिज संघाने पहिल्या दोन टी-२० जिंकल्या हे छानच म्हणावं लागेल. लोकांना फक्त आपला संघ जिंकायला हवा असतो. पडद्यामागे काय घडतंय त्यांना कुठे माहीत?’ वेस्ट इंडिज संघ आयसीसी क्रमवारीत तर तळाला आहेच. पण एकेककाळी सलग दोन विश्वचषक जिंकणाऱ्या या संघाला यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्रही होता आलेलं नाही. पहिल्यांदाच विश्वचषकात विंडिजचा संघ नसेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.