पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खिशात 19 पदके! कोण आहेत पॅरालिम्पिकवीर? वाचा

भारतीय खेळाडूंचे पॅरालिम्पिकमधील सर्व खेळ संपले असून, त्यांनी घवघवीत असं यश संपादित केलं आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केलेली असतानाच आता पॅरालिम्पिकमध्ये सुद्धा भारतीयांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरालिम्पिकची सांगता होत असताना, भारताच्या वाघांनी एकूण 19 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 5 सुवर्ण 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. पॅरालिम्पिकच्या इतिहासात ही आतापर्यंतची विक्रमी पदकसंख्या आहे. यामुळे भारत पदकांच्या क्रमवारीत 24व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

24 ऑगस्टपासून सुरू झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेची 5 सप्टेंबरला सांगता होत आहे. भारतीय खेळाडूंचे पॅरालिम्पिकमधील सर्व खेळ संपले असून, त्यांनी घवघवीत असं यश संपादित केलं आहे. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताने बॅडमिंटन क्रीडा प्रकारात एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकत इतिहास रचला आहे.

(हेही वाचाः प्रमोद भगतचा पॅरालिम्पिकमध्ये ‘सुवर्ण’ प्रताप!)

हे आहेत सुवर्ण वीर

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी तब्बल 5 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. यात प्रमोद भगत आणि कृष्णा नागर या दोघांनीही बॅडमिंटनमध्ये, तर मनीष नरवाल आणि अवनी लेखराने यांनी नेमबाजीत सुवर्णवेध साधला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावत भारताची मान उंचावणा-या नीरज चोप्रानंतर पॅरालिम्पिकमध्येही सुमित अंतिलचा भालाही सोन्याचा झाला आहे. यासोबतच सर्वात लांब भाला फेकण्याचा विक्रम केला आहे.

यांची झाली चांदी

भारताने रौप्य पदकांचंही अष्टक पूर्ण केलं आहे. यात सिंहराज अधानाने पी-4 मिक्षित 50 मीटर एयर पिस्तूल प्रकारात, थाळीफेकमध्ये योगेश कठुनियाने रौप्य पदकाची कमाई केली. यासोबतच उंच उडी टी- 63 प्रकारात मागील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणा-या मरियप्पन थंगावेलुने यावेळी रौप्य पदक मिळवले आहे व निशाद कुमारने टी-47 व प्रवीण कुमारने टी-64 उंच उडी प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली आहे. भाविना पटेलने बॅडमिंटन, सुहास यथिराजने बॅडमिंटन तर देवेंद्र झाझडियाने भालाफेक मध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे.

(हेही वाचाः सिद्धार्थ शुक्लाने पाहिले होते मॅराडोना होण्याचे स्वप्न, पण…)

सहा कांस्यपदके

सुवर्ण पदक मिळवणा-या अवनी लेखराने महिलांच्या 50 मीचर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्य पदक मिळवत दुहेरी कामगिरी बजावली. तसेच सिंहराज अधनानेही रौप्य पदकासह 10 मीटर एयर पिस्तूलच्या फायनलमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. तिरंदाजीतही हरविंदर सिंहने भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. बॅडमिंटनमध्ये एसएल-3 प्रकारात मनोज सरकारने तर भालाफेक मध्ये सुंदर सिंह गुर्जर आणि उंच उडीत शरद कुमारने भारताला कांस्य पदक मिळवून दिलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here