महिला हॉकी संघाने रचला इतिहास! पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक

184

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रविवारचा भारतासाठी आनंदाचा ठरला. त्याचप्रमाणे सोमवारची सकाळ सुद्धा भारताने विजयी सलामी देत केली आहे. भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाला नमवत इतिहास रचला आहे. या विजयासोबतच भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तब्बल 41 वर्षांनंतर महिला हॉकी संघाने ही चक दे कामगिरी करत, भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

 

ऑस्ट्रेलियावर 1-0 ने मात

सोमवारी उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्या वाघिणींनी कांगारुंवर 1-0 ने मात करत, त्यांना चारीमुंड्या चीत करण्याचा मोठा पराक्रम केला आहे. या संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने आक्रमक मारा केला. त्याचप्रमाणे प्रभावी संरक्षणाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला गोलचा भोपळाही फोडू दिला नाही.

गोलकीपर सविताने संरक्षक तटबंदीप्रमाणे उभे राहून, ऑस्ट्रेलियाचा मारा परतावून लावला. तर गुरजीत कौरने अचूक गोल करत भारताचा विजय निश्चित केला. यामुळे भारताच्या महिला आणि पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक 2020च्या उपांत्य फेरीत धडक देत, भारताला पदक मिळवून देण्याच्या आशा पल्लवीत केल्या आहेत.

विशेष म्हणजे ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, पुढील सामन्यासाठी त्यांना भरभरुन शुभेच्छा देण्यात येत आहेत. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही त्यांना शुभेच्छा देत, भारत तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे, असे म्हटले आहे.

अजून एक पदक मिळवण्याची संधी

टोकियो ऑलिम्पिकच्या अॅथलेटिक्स प्रकारात भारताच्या कमलप्रीत कौरला डिस्कस थ्रोमध्ये पदक मिळवण्याची संधी आहे. पात्रता फेरीत भरीव कामगिरी करत अंतिम फेरी गाठलेल्या कमलप्रीतकडून भारताला आशा आहेत. सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे,

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.