- ऋजुता लुकतुके
भारताची स्टार जिमनॅस्ट दीपा कर्माकरचा समावेश आशियाई स्पर्धेसाठीच्या संघात झालेला नाही. पण, तिने पात्रता निकषांमध्ये सूट देण्याची विनंती साईकडे केली आहे. भारताची स्टार जिमनॅस्ट दीपा कर्माकर जवळ जवळ २०१९ पासून खेळाच्या मैदानापासून दूर आहे. अशावेळी चीनच्या होआंगझाओमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठीही तिचा विचार झाला नाही. पण, दीपाला खेळण्याची इच्छा आहे. आणि म्हणून तिने क्रीडा प्राधिकरणाला पत्र लिहून आशियाई स्पर्धेसाठीच्या निवडीच्या निकषांमध्ये थोडी शिथिलता आणण्याची विनंती केली आहे.
एरवी भारताचा आशियाई स्पर्धेसाठीचा संघ निश्चित झाला आहे. आणि क्रीडा मंत्रालयाची अधिकृत परवानगी फक्त बाकी आहे. दीपा कर्माकर प्रुदोनोव्हा व्हॉल्ट प्रकारात खेळते. आणि याच प्रकारात तिने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथं स्थान पटकावलं होतं. पण, रिओ ऑलिम्पिकनंतर आधी दुखापतींमुळे आणि मग कोरोना उद्रेक आणि अंमली पदार्थांच्या सेवनाचा ठपका बसल्यामुळे दीपाच्या सराव आणि स्पर्धा खेळण्यामध्ये अनियमितता आली आहे. आणि त्यामुळे ती जागतिक क्रमवारीच्या बाहेर आहे.
भारतीय संघनिवडीचा एक महत्त्वाचा निकष असं सांगतो की, खेळाडू जागतिक क्रमवारीत पहिल्या आठ खेळाडूंमध्ये हवा. हा पात्रता निकष दीपा पूर्ण करत नसल्यामुळे आशियाई खेळांसाठी दीपाचा विचारच झाला नाही, असं सांगण्यात येतंय. भारतीय जिमनॅस्टिक संघटनेनं ११-१२ जुलै रोजी ओडिशातील भुवनेश्वर इथं पात्रता स्पर्धाही घेतल्या यात दीपा सहा प्रकारांमध्ये सहभागी झाली होती. आणि आर्टिस्टिक जिमनॅस्टिक प्रकारात तिने पहिला क्रमांकही पटकावला होता. पण, पात्रता निकष पूर्ण होत नसल्याने तिचा विचारच झाला नाही. तिच्या अनुपस्थितीत प्रणती नायक आणि प्रणती दास यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
(हेही वाचा – Chandrayaan-3 : चांद्रयान- 3 यानाने पाठवला पहिला फोटो)
खुद्द दीपाने मात्र अजून धीर सोडलेला नाही. आणि क्रीडा प्राधिकरण अर्थात साईला पत्र लिहून तिच्यासाठी पात्रता निकषांत सूट देण्याची विनंती तिने केली आहे. दीपा या पत्रात म्हणते, ‘२०१७ आणि २०१९ मध्ये लिगामेंटला इजा पोहोचल्यामुळे मी सराव करू शकले नाही. पुढे कोरोना काळात स्पर्धाच फारशा झाल्या नाहीत. आणि त्यातच उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे २१ महिन्यांची बंदी मला भोगावी लागली. या सगळ्यात पुरेशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होता आलं नाही. याचा विचार करून आशियाई खेळांसाठी मला संधी मिळावी.’
दीपाच्या या पत्रावर आता साई आणि केंद्र सरकार काय विचार करतात यावर दीपाच्या आशियाई स्पर्धेतील सहभाग अवलंबून आहे. जिमनॅस्टिक संघटनेनं आपली खेळाडूंची यादी साई तसंच क्रीडा मंत्रालयाकडे पाठवली आहे. आणि मंगळवारी ८ ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध होईल, अशी शक्यता आहे. आशियाई क्रीडास्पर्धा येत्या २३ सप्टेंबरपासून चीनमध्ये सुरू होत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community