India’s Tour of West Indies : एकदिवसीय मालिका जिंकली. पण, भारतीय संघातील हे कच्चे दुवे उघड

भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणेच विंडीजविरोधातील कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकली आहे. पण, आगामी आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघातील काही कच्चे दुवेही उघड झाले आहेत.

171
India’s Tour of West Indies : एकदिवसीय मालिका जिंकली. पण, भारतीय संघातील हे कच्चे दुवे उघड

ऋजुता लुकतुके

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला (India’s Tour of West Indies) सुरुवात झाली त्याच आठवड्यात बातमी आली की, विंडिज संघ टी-20 विश्वचषकासाठी (World T20 ) पात्र ठरू शकलेला नाही. पण, गंमत म्हणजे कुणालाच याचं आश्चर्य वाटलं नाही. गॉर्डन ग्रीनीज (Gordon Greenidge), व्हिवियन रिचर्ड्स (Viv Richards) यांच्या काळातली विंडिजची सद्दी कधीच संपुष्टात आलीय.

आताच्या संघाकडे ब्रायन लारा (Brian Lara) आणि कर्टने (Courtney Walsh) वॉल्श यांच्या काळातली ताकदही दिसत नाही. त्यामुळे हा दौरा इतर विंडिज दौऱ्यांइतका भारतीय संघाला कठीण जाणार नाही, उलट सोपाच जाणार हे आधीच ठरून गेलं होतं. त्यानुसार पहिली कसोटी भारतीय संघाने तीन दिवसांत जिंकलीही. आणि दुसऱ्या कसोटीत पाऊस पडला नसता तर ती ही आपण जिंकली असती.

पण, विंडिज दौऱ्याचं खरं उद्दिष्ट इथं मालिका जिंकणं इतकंच होतं का?

तर मालिका आपण आरामात जिंकू असा होरा होता. पण, त्याचबरोबर खासकरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीतले दर्जेदार फलंदाज मिळावेत. आणि वेगवान मारा करतील असे गोलंदाज मिळवेत अशी एक सुप्त इच्छा भारतीय संघ प्रशासनाची होती.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी (Rahul Dravid) तसं बोलूनही दाखवलं. संघ निवडीतही त्यांनी नवीन खेळाडूंना संधी देण्याचं धोरण ठेवलं. कारण, विंडिंज दौऱ्यानंतरचा भरगच्च आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रम त्यांना खुणावत होता. ऑगस्टच्या अखेरीस होणारा आशिया चषक आणि पुढच्या वर्षी होणारा टी-20 विश्वचषक, तसंच एकदिवसीय विश्वचषक. त्यादृष्टीने मात्र संघातील काही कच्चे दुवेच उघड झाले असं म्हणावं लागेल.

मधल्या फळीत रोहीत, विराटला पर्याय कोण?

पहिला एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर संघ प्रशासनाने रोहीत शर्मा आणि विराट कोहली या अव्वल फलंदाजांना विश्रांती दिली. हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व आलं. हार्दिक पांड्‌या हा रोहीत शर्मानंतर भावी कर्णधार म्हणून ओळखला जातो. निदान तशी दावेदारी तर त्याने सिद्ध केली आहे.

त्यामुळे हा बदलही अपेक्षित असाच होता.

पण, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या पराभवानंतर संघ प्रशासनाचे डोळे खाडकन उघडले असणार. कारण, विराट – रोहीत यांचे पर्याय अजून तयार झाले नाहीत, असंच हा पराभव सांगतो. अक्षर पटेलला चौथ्या क्रमांकावर बढती देण्याची चाल फसली. त्यानंतर संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा आणि खुद्‌द कर्णधार हार्दिक पांड्या स्वस्तात बाद झाले.

तिथेच मधल्या फळीतले कच्चे दुवे उधड झाले. कारण, सूर्यकुमार जरी स्टार फलंदाज असला तरी कामगिरीतलं सातत्य हा त्याच्या बाबतीतला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि संजू सॅमसनला पुरेशी संधी मिळूनही तो त्याचं चीज करू शकलेला नाही. नाही म्हणायला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक ठोकलं. पण, सातत्याचा अभाव तिथेही दिसून आला.

(हेही वाचा – ‘इंडिया’च्या बैठकीसाठी राज्य सरकारची मदत घेणार – संजय राऊत)

त्यामुळे भारताची मधली फळी आजही तितकी मजबूत नसल्याचं दिसून आलं. आशिया चषकापर्यंत के एल राहुल आणि श्रेयस अय्यक तंदुरुस्त झाले तर कदाचित हा प्रश्न मिटू शकेल. पण, रोहीत आणि विराट यांना चांगला पर्याय आपल्याला शोधून काढावाच लागेल.

भारतीय गोलंदाज किती भेदक?

विंडिज खेळपट्ट्या अजूनही तेज गोलंदाजांना साथ देणाऱ्याच होत्या. पण, तिथे भारतीय तेज गोलंदाज नेमके किती भेदक होते हा प्रश्नच आहे. कारण, पहिल्या कसोटीचा अपवाद वगळता एकदाही भारतीय गोलंदाज विंडिज संघाला पूर्णबाद करू शकले नाहीत.

या दौऱ्यात आपण शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार, उमरान मलिक यांना संधी दिली. पण, यातील शार्दूल आणि मुकेश सोडले तर इतर गोलंदाज आपली छाप उमटवू शकले नाहीत. यातही शार्दूल आणि मुकेश यांची कामगिरी एकेका सामन्यात चांगली होती. सातत्याने बळी टिपण्याची हातोटी त्यांच्यामध्ये दिसलेली नाही.

त्यामुळे गोलंदाजीतही पर्यायांची वानवाच दिसून आली 

म्हणजे जसप्रीत बुमरा, उमेश यादव आणि महम्मद शमी यांना पर्याय कोण हा प्रश्न आजही समोर आहे. किंबहुना गोलंदाजीतील समस्या ही फलंदाजी पेक्षा जास्त भीषण आहे. कारण, आंतरराष्ट्रीय खेळपट्ट्यांवर लागणारी भेदकता भारतीय गोलंदाजांमध्ये दिसत नाही.

त्यातच पहिला टी-20 सामनाही भारताने गमावला आहे. त्यामुळे या विंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघासाठी काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरितच राहणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.