आशियाई खेळात नेमबाजीत यंदा पहिलं वैयक्तिक सुवर्ण जिंकणाऱ्या सिफ्त कौर विषयी तुम्हाला माहीत नसलेल्या काही गोष्टी. नेमबाजीतील भारताचं यंदा हे दुसरं सुवर्ण ठरलंय. याच वर्षी मार्च महिन्यात पंजाबमधल्या एका तरुण मुलीने आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आणि हातातील स्कालपेल बाजूला ठेवून तिने रायफल हातात घेतली. पण, तिचा हा निर्णय इतका बरोबर ठरला की, आज तिच्या हातात रायफलच्या बरोबरीने आशियाई खेळातील सुवर्ण पदकही आहे.
सिफ्त कौर सामराने होआंग झाओ आशियाई खेळात महिलांच्या ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये सुवर्ण जिंकलं तेव्हा सहा महिन्यांपूर्वीचा तो दिवसच तिला सगळ्यात आधी आठवला. म्हणून ती बोलून गेली, ‘दोन्ही कामं अशीच होती की, त्यात कमालीची एकाग्रता आणि अचूकता हवी होती. पण, त्यातही मी रायफल निवडली.’ २३व्या वर्षी सिफ्त कौरने एमबीबीएस अभ्यासक्रम सोडून देऊन नेमबाजीतच कारकीर्द घडवण्याचं ठरवलं आणि नशिबाने तिला त्याचं फळही लगेच मिळालं. तोपर्यंत मागची काही वर्षं ती फरिदकोट इथं जीजीएस मेडिकल कॉलेज आणि पहाटे तसंच संध्याकाळी नेमबाजीची रेंज असा दिवस घालवत होती.
‘या मार्च महिन्यात मी एमबीबीएस कॉलेज सोडलं आणि लगेचच अमृतसरच्या जेएनडीयू विद्यापीठात शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा निर्णय मी नेमका कसा घेतला, सांगता येणार नाही. पण, आई-वडील म्हणाले. त्यांनीच प्रेरणा दिली. खरंतर वैद्यकीय अभ्यासक्रमानंतर प्रशासकीय सेवेत जाण्याचा माझा विचार होता.’ थोडक्यात, सिफ्त कौर अपघाताने नेमबाज झाली. आणि शेवटी इथंच रमली. नेमबाजीची सुरुवातही तिने खूप उशिरा म्हणजे २०१६ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी केली. तिच्या एका बहिणीने तिला पहिल्यांदा नेमबाजी रेंजमध्ये नेलं. तिथे शॉटगन प्रकारात सिफ्तने आपलं नशीब आजमावायला सुरुवात केली. आणि म्हणता म्हणता ती राज्य स्तरावर खेळायला लागली.
(हेही वाचा – Tahawwur Rana : २६/११ च्या हल्ल्यातील संशयित तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या हालचालीला वेग)
तिथे तिच्या नातेवाईकांनी सिफ्तच्या आई-वडिलांना नजरेस आणून दिलं की, सिफ्तचा नेम किती चांगला आहे. आणि विशेष म्हणजे तिच्या वडिलांना हे म्हणणं पटलं. आणि तेच सिफ्तच्या मागे लागले तिने नेमबाजीत कारकीर्द घडवावी म्हणून. आपल्या मुलीने विशेष काहीतरी करावं अशीच तिच्या पालकांची इच्छा होती. आणि आज्ञाधारक मुलीसारखी सिफ्तने त्यांची इच्छा पूर्ण केली. रायफलमधलं चायनीज वर्चस्व सिफ्तने कसं मोडून काढलं या प्रश्नावर तिने अगदी सहज आणि थेट उत्तर दिलं. ‘यावर्षी विद्यापीठ स्पर्धांमध्ये खेळले तेव्हाची चायनीज आव्हान होतं आणि तिथेही मी सुवर्ण जिंकलं. त्यामुळे मला चायनीज खेळाडूंशी खेळण्याचा अनुभव होता. मला त्यांची भीती वाटत नव्हती. मी माझे गुण किती आहेत यावर मात्र लक्ष ठेवून होते. वारंवार प्रशिक्षकांनाही विचारत होते. माझ्याकडून विश्वविक्रम झालाय याची मात्र मला कल्पनाही नव्हती,’ असं सिफ्त कौर स्वाभाविकपणे म्हणाली. आशियाई खेळांपूर्वी दोन महिने चीनच्याच चेंगडू शहरात विद्यापीठ स्पर्धा झाल्या होत्या. यात ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात सिफ्त कौरने सुवर्ण तर आशी सिंगने कांस्य जिंकलं होतं. यंदा आशी सिंगचं रौप्य थोडक्यात हुकलं. शेवटचा नेम चुकीचा बसून तिने फक्त ८.९ गुण मिळवले आणि तिथे तिचं रौप्य हुकलं. पण, या व्यतिरिक्त सिफ्त कौर आणि आशी सिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या चांगली कामगिरी करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community