चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२३ चा फायनलचा सामना रंगला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात अखेर चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूवर षटकार-चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला. आयपीएलच्या फायनल सामन्यात गुजरात टायटन्सचा त्यांच्याच घरेलू मैदानावर पराभव करून चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचा किताब जिंकला. या टूर्नामेंटमध्ये धोनीच्या निवृत्तीबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, हा सामना संपल्यानंतर धोनीनं मी अजून एक वर्ष तरी आयपीएल खेळेल, असं म्हटलं आणि सर्व अशाप्रकारच्या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला. ३१ मार्चला सुरु झालेल्या या आयपीएल हंगामात दोन महिन्यानंतर यंदाचा चॅम्पियन मिळाला. दरम्यान, या हंगामात अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्यात आली.
फायनलचा सामना तीन दिवस रंगला
आयपीएल २०२३ चा सामना लीगच्या इतिहासातील एकमेव असा सामना होता, जो तीन दिवस चालला. फायनलच्या सामन्याचं आयोजन २८ मे रोजी करण्यात आलं होतं. परंतु, पावसामुळे हा सामना त्यादिवशी रद्द करण्यात आला. त्यानंतर हा सामना २९ मेला राखीव दिवशी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. या दिवशीही पावसाने हजेरी लावल्याने सामन्याचे तास वाढले आणि ३० मे च्या रात्री २.३० मिनिटांनी हा सामना संपला. जवळपास ३१ तास हा सामना सुरु राहिला.
पहिल्या संघाची सरासरी धावसंख्या
आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांची सरासरी धावसंख्या या हंगामात सर्वाधिक राहिली. या हंगामात पहिल्या इनिंगची सरासरी धावसंख्या १८३ राहिली. जी दुसऱ्या हंगामांपेक्षा अधिक आहे. याआधी २०१८ मध्ये पहिल्या इनिंगची सरासरी धावसंख्या १७२ होती. तर गतवर्षीच्या हंगामाचा पहिल्या इनिंगची सरासरी धावसंख्या १७१ होती.
सर्वात जास्त रन रेट
आयपीएल २०२३ मध्ये संघांनी खूप वेगानं धावा केल्या. ज्यामुळे आयपीएलच्या कोणत्याही हंगामाचा सर्वात जास्त रन रेट बनवण्याच्या विक्रमला यावर्षी गवसणी घालण्यात आली. या हंगामात ८.९९ च्या सरासरीनं धावा काढल्या गेल्या. याआधी २०१८ मध्ये ८.६५ स्ट्राईक रेटने धावा करण्यात आल्या होत्या. तर २०२२ मध्ये ८.५४ च्या स्ट्राईक रेटने धावा काढण्यात आल्या होत्या.
सर्वात जास्त अर्धशतक
आयपीएल २०२३ मध्ये एकूण १५३ अर्धशतक ठोकण्यात आले आहे. इतर हंगामाच्या तुलनेत खूप जास्त आहेत. याआधी २०२२ मध्ये ११८ अर्धशतक झाले होते. तर २०१६ मध्ये ११७ वेळा अर्धशतकी खेळी करण्यात आली होती.
२०० हून अधिक धावांचं यशस्वी चेज
या हंगामात अनेक संघांनी २०० आणि त्याहून अधिक धावांचं लक्ष्य गाठलं. यावेळी एकूण ८ वेळा २०० किंवा त्याहून जास्त धावा चेज करण्यात संघांना यश मिळालं. याआधी २०१४ मध्ये फक्त तीन वेळा २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांचा पाठलाग करण्यात संघ यशस्वी झाले. तसंच २०१०,२०१८ आणि २०२२ मध्ये दोनदा अशा धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यात आलं होतं.
सर्वात जास्त वेळा बनला २०० पेक्षा जास्त धावा
आयपीएल २०२३ मध्ये ३७ वेळा २०० हून अधिक धावा करण्यात आल्या. इतर हंगांमांच्या तुलनेत हे अधिक आहेत. २०२२ मध्ये १८ वेळा २०० पेक्षा जास्त धावांचं टार्गेट देण्यात आलं होतं. तर २०१८ मध्ये १५ वेळा २०० पेक्षा जास्त धावा करण्यात आल्या होत्या.
सर्वात जास्त षटकार
आयपीएल २०२३ मध्ये इतर हंगांमांच्या तुलनेत सर्वात जास्त षटकार ठोकण्यात आले आहेत. या हंगामात ११२४ षटकार ठोकले गेले आहेत. इतर हंगामाच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. याआधी २०२२ मध्ये १०६२ षटकार मारले होते. याशिवाय आयपीएलच्या अन्य हंगामात याआधी कधीही एक हजारांहून अधिक षटकार ठोकण्यात आले नव्हते.
Join Our WhatsApp Community