- ऋजुता लुकतुके
आयपीएलमध्ये बुधवारी रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला गुजरात टायटन्सकडून पराभवाची चव चाखावी लागली. गुजरात संघाला शेवटच्या षटकांत विजयासाठी १५ धावा हव्या होत्या आणि हातात तळाचे ४ फलंदाज होते. पण, राशिद खानने किल्ला लढवत शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि संघाला विजय मिळवून दिला. आतापर्यंत राजस्थानचा संघ या हंगामातील एक शिस्तबद्ध संघ मानला गेलाय. आताही १ बाद ६४ अशा चांगल्या सुरुवातीनंतर त्यांच्या गोलंदाजांनी गुजरातला रोखलं होतं आणि संघ विजयाच्या जवळही पोहोचला होता. पण, राशिद खानने त्यांचं विजयाचं गणित बिघडवलं. (IPL 2024 GT vs RR)
या अनपेक्षित पराभवामुळे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) चांगलाच नाराज झाला होता. त्यातच षटकांची गती न राखल्यामुळे सामन्यानंतर त्याच्यावर दंडही झाला. ‘राजस्थान रॉयल्स संघाने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती न राखल्यामुळे कर्णधार संजू सॅमसनच्या मानधनातून १२ लाख रुपये कापून घेण्यात येत आहेत. संघाची पहिली चूक होती,’ असं सामन्यानंतर आयपीएल प्रशासनाने पत्रक काढून स्पष्ट केलं. (IPL 2024 GT vs RR)
(हेही वाचा – Arvind Kejriwal : आम आदमी पक्षात दलितांशी भेदभाव; Rajkumar Anand यांचा केजरीवालांवर घणाघात)
गुजरात संघाने १९६ धावांचा पाठलाग करताना २ बाद ७७ अशी मजल मारली होती. पण, आवेश खान, कुलदीप सेन आणि यजुवेंद्र चहल यांनी मधल्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी करत गुजरातचे गडी बाद केले. त्यामुळे राजस्थानच्या विजयाची आशा निर्माण झाली होती. पण, शेवटच्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर १७ धावा निघाल्या. राशिद खानने ३ चौकार वसूल करत गुजरातला विजय मिळवून दिला. या नादात राजस्थानकडून षटकांचा वेग राखला गेला नाही आणि संजू सॅमसनवर ही कारवाई झाली आहे. संजू सॅमसनने या सामन्यात ३८ चेंडूंत ६८ धावा करत राजस्थानला १९० च्या पार नेण्यात मोठी भूमिका बजावली. (IPL 2024 GT vs RR)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community