- ऋजुता लुकतुके
या आयपीएलमध्ये आपला वेग आणि अचूकता यामुळे खळबळ उडवून देणारा लखनौ सुपरजायंट्सचा तेज गोलंदाज मयंक यादव पायाच्या दुखापतीमुळे सध्या बेजार आहे आणि दुखापतीविषयीचा अपडेट फारसा आनंददायी नाही. लखनौचे पुढील दोन सामने तो खेळू शकणार नाही, असं संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी गुरुवारी स्पष्ट केलं आहे. पण, त्याचवेळी अशीही भीती व्यक्त होतेय की, तो उर्वरित स्पर्धा आणि त्यानंतर होणारा टी-२० विश्वचषक खेळू शकेल की नाही? (IPL 2024 Mayank Yadav)
लखनौचे पुढील दोन सामने १२ आणि १४ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहेत. आणि त्यानंतर १९ एप्रिलच्या सामन्यापूर्वीव तरी मयंक (Mayank Yadav) तंदुरुस्त व्हावा अशी संघाची अपेक्षा आहे. ‘१९ तारखेपर्यंत मयंक तंदुरुस्त व्हावा असाच आमचा प्रयत्न आहे. आणि मयंक त्या दृष्टीने त्यासाठी मेहनत घेतोय. दिल्ली आणि त्यानंतरच्या सामन्यातही मयंक खेळणं कठीण आहे. पण, १९ पर्यंत तो खेळला तर आम्हाला हवं आहे. या आयपीएलमध्ये त्याला खेळायला संधी मिळणं आवश्यक आहे,’ असं लखनौचा कर्णधार के एल राहुल म्हणाला. (IPL 2024 Mayank Yadav)
(हेही वाचा – IPL 2024 Riyan Parag : रियान परागच्या पाठीवर सुनील गावसकरांची कौतुकाची थाप)
टी-२० विश्वचषकात मयंक भारतीय संघाचा दावेदार
मयंक यादवला (Mayank Yadav) रविवारच्या सामन्यात पायात वरच्या बाजूला त्रास जाणवायला लागला. एकच षटक टाकून तो तंबूत परतला. आणि या षटकातही त्याने १३ धावा दिल्या. त्यानंतर केलेल्या एमआरआयमध्ये पायाचा स्नायू थोडा सुजल्याचं समोर आलं आहे. थोडी विश्रांती आणि व्यायाम यातून तो बरा होणार आहे. पण, त्याची गोलंदाजीची शैली आणि ताशी १५० किमी वेगाने करत असलेली गोलंदाजी पाहिली तर मयंकला आणि त्याच्या संघाला त्याच्या तंदुरुस्तीची काळजी घ्यावी लागणार आहे. (IPL 2024 Mayank Yadav)
भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे वेग आणि अचूकताही आहे. त्यामुळे त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २१ वर्षीय मयंकने ३ सामन्यांत ५४ धावा देत ६ बळी मिळवले आहेत. आणि आयपीएलच्या मागोमाग असलेल्या टी-२० विश्वचषकात तो भारतीय संघाचा दावेदार आहे. अशावेळी आयपीएलमध्ये त्याला पुरेसा सराव मिळणं आणि त्यानंतरही त्याची लय टिकून राहणं हे भारतीय संघासाठीही महत्त्वाचं आहे. कारण, भारतीय संघासाठी तो एक चांगला पर्याय आहे. (IPL 2024 Mayank Yadav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community