IPL 2024 MI bt RCB : इशान, सूर्यकुमार आणि बुमराच्या धडाक्यापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा धुव्वा

IPL 2024 MI bt RCB : मुंबई इंडियन्सनी घरच्या मैदानावर बंगळुरूचा ७ गडी आणि ३० चेंडू राखून धुव्वा उडवला. 

206
IPL 2024 MI bt RCB : इशान, सूर्यकुमार आणि बुमराच्या धडाक्यापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा धुव्वा
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील हा सामना हा सध्या एकाच नावेवर सवार असलेल्या दोन संघांतील सामना होता. कारण, दोन्ही संघांना आतापर्यंत लीगमध्ये फक्त एकेकच सामना जिंकता आला होता. पण, जेव्हा प्रत्यक्ष सामना सुरू झाला तेव्हा मुंबईसाठी हे जुने संदर्भ गळून पडले. त्यांनी घेतलेले सगळे निर्णय बरोबर ठरले. उलट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सगळंच चुकत गेलं. (IPL 2024 MI bt RCB)

नाणेफेक हरल्यावर बंगळुरूला पहिली फलंदाजी करायची होती. तर विराट कोहली ७ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराचं ते षटकच भन्नाट होतं. चेंडूंत टप्पा आणि गतीमध्ये बदल करत त्याने विराटला अलगद जाळ्यात ओढलं. अखेर चौथ्या चेंडूवर विराट यष्टीरक्षक इशानकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर फाफ दू प्लेसिसने एक बाजू लावून धरत ४० चेंडूंत ६१ धावा केल्या. तर रजत पाटिदारनेही २६ चेंडूंत ५० धावा करत संघाला सव्वाशेच्या पार नेलं. पण, जरा जम बसलाय असं वाटत असताना फलंदाज बाद होत गेले. आणि संघाला दोनशेचा टप्पा काही गाठता आला नाही. तळाला येऊन सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दिनेस कार्तिकने २३ चेंडूंत ५३ धावा करत निदान संघाला ८ बाद १९६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी करून दिली. बंगळुरूच्या फलंदाजीची ही पडझड झाली ती जसप्रीत बुमराच्या २१ धावांमध्ये घेतलेल्या ५ बळींमुळे. (IPL 2024 MI bt RCB)

(हेही वाचा – Israel: इस्राइलमध्ये मनुष्यबळाची कमतरता! भारतातून ६,००० कामगार करणार आयात)

दुखापतीपूर्वीचा सूर्यकुमार पुन्हा एकदा दिसला

एरवी फलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर बुमराने हे यश मिळवलं. आणि बुमराच्या गोलंदाजीचं महत्त्व दुसऱ्या डावात उठून दिसलं जेव्हा इशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या मुंबईच्या फलंदाजांनी गोलंदाजीची पिसं काढली. इशानने आक्रमक सुरुवात करताना ३४ चेंडूंत ६९ धावा केल्या. रोहितबरोबर त्याने मुंबईला १०१ धावांची सलामीही करून दिली. रोहितने २४ चेंडूंत ३८ धावा केल्या. (IPL 2024 MI bt RCB)

आणि त्यानंतर मैदानावर अवतरल सुर्यकुमार नावाचं वादळ. मनाला येईल त्या दिशेनं आणि ते ही आकाशात सुर्या चेंडू भिरकावून देत होता. १९ चेंडूंत ५२ धावा करताना त्याने ४ षटकार आणि ५ चौकार ठोकले. दुखापतीपूर्वीचा सूर्यकुमार पुन्हा एकदा दिसला आणि मुंबई इंडियन्ससाठी ही खूपच दिलासादायक गोष्ट होती. कारण, मैदानाच्या सर्व दिशांना फटके मारत असलेल्या सूर्यकुमारला रोखणं हे कुठल्याही गोलंदाजासाठी अशक्यच काम असतं. आज मुंबईच्या फलंदाजांनी बंगळुरूची गोलंदाजी अगदीच सामान्य करून टाकली. अखेर १५.४ षटकांत ७ गडी राखून मुंबईने विजय पूर्ण केला. मुंबई इंडियन्सनी आता शेवटच्या दोन सामन्यांत विजय मिळवून स्पर्धेत थोडंफार तरी पुनरागमन केलं आहे. तर बंगळुरूसाठी हा ६ सामन्यांतील पाचवा पराभव ठरला आहे. (IPL 2024 MI bt RCB)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.