IPL 2024, MI bt SRH : सूर्यकुमार नावाच्या वादळाने हैद्राबादला हादरवलं

230
Ind vs SL, 3rd T20 : सूर्यकुमारचं आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पहिलंच षटक भारताला सुपर ओव्हरपर्यंत घेऊन गेलं
  • ऋजुता लुकतुके

मुंबईचं वानखेडे स्टेडिअम समुद्राच्या जवळ असल्यामुळे संध्याकाळी तिथे बऱ्यापैकी वारा असतो. पण, सोमवारी रात्री तिथं सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) नावाचं वादळ आलं होतं. आणि त्यात सनरायझर्स हैद्राबादचा संघ पुरता वाहून गेला. खरंतर पहिली फलंदाजी करताना हैद्राबाद संघाने खराब सुरुवातीनंतरही ८ बाद १७३ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सातत्यपूर्ण गोलंदाजांनी मुंबईची अवस्था ३ बाद ३१ अशी केली होती. तोपर्यंत हैद्राबादसाठी सगळं काही आलबेल होतं. पण, त्यानंतर सूर्यकुमार फलंदाजीला आला. (IPL 2024)

एकतर रोहित (४) आणि इशान (९) सारखे अनुभवी फलंदाज झटपट बाद झालेले असताना आणि नमन धीर ९ चेंडू खेळून काढत शून्यावर बाद झालेला असताना सुर्यकुमारने (Suryakumar Yadav) अजिबात आपले फटके खेळण्यात कुचराई केली नाही. त्याने सुरुवातीपासूनच तिसरा गिअर टाकला होता. पाचव्या षटकात मुंबईचं अर्धशतक फलकावर लागलेलं होतं. तिलक वर्माचीही साथ त्याला होती.

(हेही वाचा – Poonch Terror Attack : पुंछ दहशदवादी हल्ल्यातील २ दहशतवाद्यांची रेखाचित्र प्रसिद्ध )

दोघांनी गोलंदाज फारशी संधी देत नसताना आपले फटके शोधून काढले. सूर्यकुमारचं अर्धशतक काहीसं धिमं होतं. आणि त्यासाठी त्याने ३० चेंडू घेतले. पण, त्यानंतर पुढच्या ५२ धावा त्याने २१ चेंडूंत केल्या.

(हेही वाचा – CBI चे डीएसपी सायबर टोळीच्या जाळ्यात, २ लाख गमावले)

५१ चेंडूंत नाबाद १०२ धावा करताना त्याने ६ टोलेजंग षटकार आणि १२ उत्तुंग चौकार ठोकले. सूर्यकुमारला रोखणं सोमवारी कुणालाही शक्य झालं नसतं. तेराव्या षटकात तो काहीसा अडखळला होता. आणि मांडीच्या स्नायूची दुखापत त्याला पुन्हा त्रास देईल असं वाटत होतं. पण, त्याने फिजिओलाही मैदानात बोलवलं नाही. स्ट्रेचिंगच्या व्यायामाने त्याने वेळ मारुन नेली. आणि अचूक टायमिंगचं वरदान लाभलेल्या या फलंदाजाने एकहाती सामना फिरवला. तिलक वर्मासह चौथ्या गड्यासाठी त्याने नाबाद १४३ धावांची भागिदारी केली. यात तिलकचा वाटा ३२ चेंडूंत ३७ धावांचा. आयपीएलमधील (IPL 2024) सूर्याचं हे दुसरं तर टी-२० तील सहावं शतक.

त्यापूर्वी हैद्राबाद संघाची सुरुवात आज चांगलीच अडखळती झाली होती. सलामीवीर ट्रेव्हिस हेडने ४८ धावा केल्या खऱ्या. पण, त्यानंतर मधली फळी रखडल्यामुळे संघाची अवस्था लवकरच ७ बाद १२३ झाली होती. पण, कर्णधार पॅट कमिन्सने १७ चेंडूंत ३७ धावा करत संघाला शेवटच्या दोन षटकांत १७३ धावांचा टप्पा गाठून दिला. मुंबईकडून हार्दिक आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. या विजयामुळे मुंबईच्या संघाने ८ गुण मिळवत गुणतालिकेत आठवं स्थान मिळवलं आहे. तर हैद्राबाद १२ गुणांसह आता चौथ्या स्थानावर आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.