IPL 2024 RCB Resurgence : ‘या’ ६ गोष्टींमुळे बंगळुरूने आयपीएलमध्ये उलटवली बाजी

IPL 2024 RCB Resurgence : ८ पैकी ७ सामने गमावलेल्या बंगळुरूने शेवटचे ६ सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश मिळवला.

107
IPL 2024 RCB Resurgence : ‘या’ ६ गोष्टींमुळे बंगळुरूने आयपीएलमध्ये उलटवली बाजी
  • ऋजुता लुकतुके

या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) कामगिरी ही फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून वर येणारीच म्हणावी लागेल. कारण, पहिल्या ८ पैकी ७ सामने संघाने गमावले होते. त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त काळ संघ गुणतालिकेत तळाला होता. पण, अचानक संघाने उसळी मारली. आणि उर्वरित ६ सामने मोठ्या फरकाने जिंकत त्यांनी आता बाद फेरीही गाठली आहे. संघाच्या पुनरागमनामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघच या स्पर्धेतील सगळ्यात लक्षवेधी ठरला आहे. अशावेळी बघूया कुठल्या ६ गोष्टींनी बंगळुरूला रुळावर आणलं. (IPL 2024 RCB Resurgence)

पाटिदारचे षटकार

रजत पाटिदारवर तिसऱ्या क्रमांकावर येऊन धावगती कायम ठेवण्याची किंवा तिला गती देण्याची एक ठोस भूमिका संघ प्रशासनाने दिली होती आणि ती पाटिदारने इमाने इतबारे निभावली. विराट कोहलीच्या छायेत न वावरता त्याने आपला स्वतंत्र ठसा उमटवला. ५ अर्धशतकं आणि १८० धावांचा स्ट्राईकरेट त्याच्या नावावार आहे. हेच त्याच्या आणि बंगळुरू संघाच्या यशाचं गमक आहे. सुरुवातीच्या पराभवांमध्ये एक गोष्ट दिसत होती, विराटला आवश्यक साथ दुसऱ्या बाजूने मिळत नव्हती. पण, पाटिदारला सूर गवसला आणि हा प्रश्नच मिटला. (IPL 2024 RCB Resurgence)

विराट कोहलीचा फॉर्म

विराट कोहलीच्या स्ट्राईकरेटवर अख्ख्या हंगामात भरपूर चर्चा झाली आहे. अगदी सुनील गावसकर यांच्याबरोबरही विराटचे शाब्दिक वाद रंगले. त्याने केलेलं शतकही आयपीएलमधील सगळ्यात धीमं शतक म्हणून चर्चिलं गेलं. पण, विराटने आपल्या फलंदाजीवर काम सुरू ठेवलं. धावा करणं सोडलं नाही आणि त्यांची गती वाढवण्याचाही प्रयत्न केला. परिणामी, आज १४ सामन्यांनंतर त्याचा स्ट्राईकरेटही १५५ धावांचा आहे आणि ७०८ धावांसह ऑरेंज कॅप त्याच्या नावावर आहे. १४ सामन्यांत त्याने १ शतक आणि ५ अर्धशतकं ठोकली आहेत. (IPL 2024 RCB Resurgence)

(हेही वाचा – Hunt For New Coach : मुख्य प्रशिक्षक पदासाठी आता बीसीसीआयच्या रडारवर स्टिफन फ्लेमिंग)

बंगळुरू संघातील परदेशी खेळाडू

फाफ दू प्लेसिसच्या कामगिरीत सातत्याचा अभाव, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, रिसी टॉपली, विल जेक्स या परदेशी खेळाडूंचा हरवलेला फॉर्म यामुळे बंगळुरू संघाचं स्पर्धेच्या पूर्वार्धात नुकसान झालं. मॅक्सवेल तर स्पर्धा अर्धवट सोडायला निघाला होता. पण, हळू हळू संघाची घडी नीट बसत गेली. फाफ आणि विराटची सलामीला जोडी जमली. विल जॅक्सचं घणाघाती शतक संघाला तारुन गेलं आणि कॅमेरिन ग्रीन अष्टपैली कामगिरी करायला लागला. या सगळ्यांनी उपयुक्त खेळाडूंची भूमिका चोख बजावली. (IPL 2024 RCB Resurgence)

फाफचं नेतृत्व

३८ वर्षीय फाफ दू प्लेसिसने चेन्नईकडून खेळताना दोनदा आयपीएल चषक उंचावला आहे. आताही तो खेळाडूंसाठी प्रेरणादायी होता. शांतपणे प्रत्येक पराभव पचवत तो खेळाडूंबरोबर काम करत होता. संघाला आवश्यक विजयी खेळाडूंची मोट कशी बांधायची याचा त्याचा अभ्यास सुरूच होता. फलंदाजीतही त्याने विराटबरोबर मोठी जबाबदारी उचलली. शनिवारी विराट बाद झाल्यावर त्यानेच टिकून राहत डावाला आकार दिला. (IPL 2024 RCB Resurgence)

गोलंदाजी रुळावर आली

पूर्वार्धात विराट आणि फाफ दू प्लेसिस धावा करत होते पण, गोलंदाज त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवतायत अशी परिस्थिती होती. म्हणजे १८०-१९० धावांचं बंगळुरूनं दिलेलं लक्ष्य प्रतिस्पर्धी संघ अगदी विनासायास पार करत होता. पण, हळू हळू ही परिस्थिती बदलली. यश दयाल आणि मोहम्मद सिराज बळी मिळवायला लागले. दयालच्या गोलंदाजीत वेगांत प्रभावी बदल आणि अचूकता दिसायला लागली. लॉकी फर्ग्युसन आणि कॅमेरून ग्रीन त्यांच्या मदतीला आले आणि मॅक्सवेल, स्वप्निल सिंगची फिरकीही कामी आली. (IPL 2024 RCB Resurgence)

क्षेत्ररक्षणात अव्वल संघ

स्पर्धेत सुरुवातीपासून बंगलुरूचा संघ क्षेत्ररक्षणात अव्वल होता. फाफ दू प्लेसिस आणि विराट कोहली हे ३५ वर्ष पार केलेले खेळाडू संघाला चपळतेचे धडे देत होते. शिवाय मॅक्सवेल आणि कॅमेरुन ग्रीनही होते. शनिवारी दू प्लेसिसने मिचेल सँटनरचा पकडलेला एकहाती झेल अख्ख्या हंगामातील त्यांच्या कामगिरीलाच न्याय देणारा आहे आणि झेल तुम्हाला सामने जिंकून देतात हे तर क्रिकेटमध्ये सर्वश्रुतच आहे. (IPL 2024 RCB Resurgence)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.