IPL 2024 RCB vs SRH : ६ पराभवांनंतर अखेर बंगळुरूची पराभवाची मालिका खंडित

IPL 2024 RCB vs SRH : बंगळुरू संघाने हैद्राबादचा ३५ धावांनी पराभव केला. 

137
IPL 2024 RCB vs SRH : ६ पराभवांनंतर अखेर बंगळुरूची पराभवाची मालिका खंडित
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी केली किंवा अगदी धावांचा पाठलागही केला. तरी संघासाठी आतापर्यंत काहीही मनासारखं होत नव्हतं. अगदी शेवटच्या सामन्यात विजयासाठी जंग जंग प्रयत्न करूनही एक धाव कमीच पडली होती. पण, सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध आणि ते ही हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडिअममध्ये बंगळुरूचं नशीब पालटलं. नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेण्याचा कर्णधार फाफ दू प्लेसिसचा निर्णय बरोबर ठरला. फलकावर ७ बाद २०६ धावा लागल्या. आणि त्यानंतर हंगामात एकदाही प्रभावी न ठरलेली संघाची गोलंदाजी भेदक ठरली. त्यामुळे हैद्राबाद संघाला प्रत्युत्तरादाखल ८ बाद १७१ धावाच करता आल्या. आणि बंगळुरूला हंगामातील दुसरा विजय मिळवता आला. (IPL 2024 RCB vs SRH)

विराट कोहली आणि फाफ दू प्लेसिस यांनी पुन्हा एकदा पॉवरप्लेमध्ये धुवाधार फलंदाजी करत ४८ धावांची सलामी करून दिली. त्यानंतर रजत पाटिदारने २० चेंडूंत ५० आणि कॅमेरुन ग्रीनने २० चेंडूंत ३७ धावा करत संघाला वेगवान दोनशेचा टप्पा गाठून दिला. विराटनेही स्पर्धेतील आपलं चौथं अर्धशतक ठोकलं. पण, त्यासाठी त्याने ४१ चेंडू घेतले. आणि धिम्या फलंदाजीमुळे विराट टीकेचा धनी ठरला. (IPL 2024 RCB vs SRH)

(हेही वाचा – World Intellectual Property Day : २६ एप्रिलला का साजरा केला जातो जागतिक बौद्धिक संपदा दिन?)

पराभवानंतर सनरायझर्स हैद्राबाद अजूनही तिसऱ्या स्थानावर कायम

सनरायझर्स हैद्राबाद संघाने आतापर्यंत या आयपीएलमध्ये तीनदा २५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पण, यावेळी मात्र पहिल्या षटकापासून त्यांचे गडी बाद होत गेले. फॉर्मात असलेला ट्रेव्हिस हेड एका धावेवर बाद झाला. तर अभिषेक शर्माने १२ चेंडूंत ३१ धावा केल्या. पण, एक उंच फटका मारण्याच्या नादात तो ही बाद झाला. शाहबाझ अहमदने ४० तर पॅट कमिन्सने ६ चेंडूंत ३१ धावा करत धावसंख्या वाढवली. पण, तोपर्यंत धावगती वाढत चालली होती. आणि अखेर आव्हान हैद्राबादच्या अवाक्याबाहेरच गेलं. (IPL 2024 RCB vs SRH)

बंगळुरूसाठी कर्ण सिंग, स्वप्निल आणि कॅमेरुन ग्रीन यांनी किफायतशीर गोलंदाजी करत प्रत्येकी २ बळी घेतले. या पराभवानंतर सनरायझर्स हैद्राबाद अजूनही तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. तर बंगळुरूचे आता ४ गुण झाले असले तरी सरस धावगतीमुळे पंजाब गुणतालिकेत त्यांच्या वर नवव्या स्थानावर आहे. तर बंगळुरू संघ अजूनही तळालाच आहे. (IPL 2024 RCB vs SRH)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.