IPL 2024 Sanju Samson Catch : संजू सॅमसनला झेलबाद ठरवताना तिसऱ्या पंचांनी नेमकं काय पाहिलं?

IPL 2024 Sanju Samson Catch : संजू सॅमसन मैदानात होता तेव्हा राजस्थानच्या विजयाची आशा होती. 

149
IPL 2024 Sanju Samson Catch : संजू सॅमसनला झेलबाद ठरवताना तिसऱ्या पंचांनी नेमकं काय पाहिलं?
  • ऋजुता लुकतुके

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना अखेर दिल्लीने २० धावांनी जिंकला आणि आपल्या बाद फेरीतील आशाही दिल्लीने कायम ठेवल्या आहेत. राजस्थानसमोर विजयासाठी २२२ धावांचं लक्ष्य असताना त्यांची मदार होती ती कर्णधार संजू सॅमसनवर. तो ८६ धावांवर नाबाद होता आणि षटकामागे १३ धावा करण्याचं आव्हान असलं तरी तो शर्थीचे प्रयत्न करत होता. पण, इतक्यात सोळाव्या षटकात आणखी एक उत्तुंग षटकार ठोकण्याच्या प्रयत्नांत संजू सीमारेषेवर झेलबाद झाला. शाय होपने हा झेल पकडला आणि तो पकडताना होपचा पाय सीमारेषेला लागला नाही ना, हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदतही घेण्यात आली. पण, तरीही हा निर्णय काहीसा वादग्रस्त ठरलाच. (IPL 2024 Sanju Samson Catch)

होपने चेंडू पकडल्यावर आपण सीमारेषेपलीकडे जाणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली. पण, त्याचा थोडाफार तोल गेलाच. त्या दरम्यान त्याचा पाय सीमेवरील दोरीला लागला नाही ना, हा प्रश्न होता. आधी सॅमसनने डगआऊटच्या दिशेनं चालायला सुरुवात केली होती. पण, मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा आणि इतर लोकांना होपचा पाय दोरीला लागल्याची शंका येत होती. त्यामुळे सॅमसन मैदानात परतला आणि त्याची मैदानातील पंचांबरोबर काहीशी बाचाबाची झाली. (IPL 2024 Sanju Samson Catch)

(हेही वाचा – भारताने Chinaला ‘या’ उद्योगामध्ये टाकले मागे; आता जगभरात भारताचाच बोलबाला सुरु)

स्पर्धेचे टीव्ही प्रसारणकर्ते स्टार स्पोर्ट्सने माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूचा समालोचन करतानाचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात सिद्धू तिसऱ्या पंचांच्या या निर्णयावर टीका करताना दिसतो. ‘दूधात माशी पडल्यासारखं हे झालं,’ असं सिद्धू इथं म्हणताता दिसतो. ‘संजू सॅमसन बाद झाल्यानंतर सामना फिरला. तो निर्णय खूप महत्त्वाचा होता. रिप्ले पाहिल्यावरही असंच दिसतं की, क्षेत्ररक्षकाचा पाय एकदा नव्हे दोनदा दोरीला लागला होता. त्रयस्थ म्हणून मी हे सांगू शकतो. दूधात माशी पडलेली समोर दिसतोय आणि तुम्ही मला म्हणाल, हे दूध पी. मी नाही पिणार!’ असं सिद्धू शेवटी म्हणाले. (IPL 2024 Sanju Samson Catch)

सॅमसन सोळाव्या षटकांत बाद झाला तेव्हा राजस्थानला विजयासाठी आणखी ४८ धावांची गरज होती आणि षटकामागे १४ धावा हव्या होत्या. पण, त्यानंतर शुभम दुबेच्या २५ धावांचा अपवाद सोडला तर बाकीचे फलंदाज फटकेबाजी करू शकले नाहीत. राजस्तान संघाचा ११ सामन्यांतील हा तिसरा पराभव होता. तर दिल्लीने आता ६ विजयांसह १२ गुण कमावले आहेत आणि सनरायझर्स हैद्राबाद, लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जसह त्यांचे आता १२ गुण झाले आहेत. (IPL 2024 Sanju Samson Catch)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.