IPL 2025, Bat Controversy : आयपीएलमध्ये पुन्हा पंचांनी तपासली हार्दिक पांड्याची बॅट, नेमकं काय घडतंय?

105
ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये यंदा रविवारी एक विचित्र गोष्ट आणि ती ही तीनदा घडली. एरवी भर मैदानात हे कधी पाहायला मिळालं नव्हतं. रविवारी झालेल्या दोन सामन्यांमध्ये पंचांनी शिमरॉन हेटमायर (shimron hetmyer), फील सॉल्ट (Phil Salt) आणि हार्दिक पांड्या (hardik pandya) अशा तीन फलंदाजांची खेळ थांबवून बॅट तपासून पाहिली. तीनही वेळी खेळाडूंनी खेळपट्टीवर प्रवेश करताच फलंदाजी सुरू करण्यापूर्वी पंचांनी वेळ घेऊन त्यांची बॅट तपासली. आणि त्यांच्याकडे असलेल्या ‘बॅटगेज’ नावाच्या उपकरणातून त्यांनी ती घालूनही बघितली. एकाच दिवसांत असं तीनदा घडल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. तेव्हा समजून घेऊया नेमकं काय होतंय? (IPL 2025, Bat Controversy)

(हेही वाचा – Nitin Gadkari : देशात आता टोलनाके रहाणार नाहीत; १५ दिवसांत येणार नवी पॉलिसी)

पंच बॅट का तपासून पाहत आहेत? 

हा आयपीएलच्या नियमावलीचाच भाग आहे. या स्फोटक फलंदाजीच्या खेळात फलंदाजांना बॅटचा अवाजवी फायदा मिळू नये, सगळ्यांच्या बॅट सारख्याच असाव्यात हे सुनिश्चित करण्याचा हा प्रयत्न आहे. यंदा या नियमांत बीसीसीआयने सूक्ष्म बदल केला आहे. सामन्यातील पंच व सामनाधिकाऱ्यांना आता सामन्यात कुठल्याही वेळी खेळाडूंची बॅट तपासून पाहण्याचा अधिकार आहे. त्यासाठी खेळ थांबला तरी ती मुभा पंचांना आहे. यापूर्वी सर्वच खेळाडूंची बॅट तपासून पाहिली जात होती. पण, ती प्रक्रिया डावापूर्वी ड्रेसिंग रुममध्ये व्हायची. पण, पंचांकडून तपासून घेतलेली बॅट ऐन फलंदाजीच्या वेळी फलंदाजांनी वापरली नाही आणि दुसरी वापरली तर, हा धोका लक्षात घेऊन यंदा ऐन सामन्यात बॅट तपासण्याचा अधिकार पंचांना दिला गेला आहे. जेव्हा सामना निर्णायक वळणावर असतो, तेव्हा खासकरून पंच बॅट तपासून या बॅटमुळे खेळाडूला फटकेबाजीसाठी वेगळी मदत मिळणार नाही ना, हे पाहत आहेत.

त्यासाठी पंचांकडे ‘बॅटगेज’ देण्यात आले आहेत. या बॅटगेजमधून बॅट आरपार गेली तर ती नियमित बॅट असेल. या बॅटगेजला मध्ये बॅटच्या आकाराचं भोक आहे. म्हणजेच प्रमाणित आकाराच्या बॅटचं भोक आहे. त्यातून बॅट गेली तर नियमांत बसलेली बॅट समजण्यात येईल. हार्दिक पांड्या फलंदाजीला आला ती डावाची शेवटची षटकं होती. त्यामुळे पंचांनी बॅट तपासून पाहिली.

‘क्रिकेटच्या नियमानुसार, बॅटचं वजन फलंदाज ठरवू शकतात. पण, तिचा आकार, जाडी, कडा हे सगळं ठरवलेल्या आकाराचं हवं. शिवाय हँडल किती मोठं चालेल हे ही ठरलेलं आहे. पूर्वीही पंच बॅट तपासून पाहत होते. पण, तेव्हा ड्रेसिंगरुममध्ये सगळ्यांच्याच बॅट तपासून पाहिल्या जायच्या. पण, यंदा भर मैदानात बॅट तपासण्याचा अधिकार पंचांना देण्यात आला आहे. त्यामुळे फसवणूक टळेल,’ असं आयपीएलमध्ये पंच म्हणून काम केलेल्या एका माजी पंचांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे.

फलंदाजाची बॅट पंचांकडे असलेल्या बॅटगेजमधून आरपार गेली पाहिजे. तशी ती गेली नाही तर त्यासाठी संघाचे किंवा फलंदाजांचेही गुण कापून घेण्यात येत नाहीत. किंवा त्यांना ताकीदही मिळत नाही. फक्त फलंदाजांना बॅट बदलायला सांगितलं जातं. हँडलसह बॅटची एकूण उंची ही ३८ इंचांपेक्षा जास्त असता कामा नये.

आयपीएलचे बॅटविषयीचे नियम काय सांगतात,

जाडी – ४.२५ इंच

खोली – २.६४ इंच

कड – १.५६ इंच

एकूण बॅटच्या लांबीत हँडलची उंची ५२ टक्क्यांपेक्षा मोठी असता कामा नये. जागतिक स्तरावर तसंच देशांतर्गत स्पर्धांमध्येही बॅटविषयीचे हे नियम अस्तित्वात आहेत. इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये आधीपासून त्यांचं कडक पालन होतं. आणि गेल्या हंगामातच इसेक्स विरुद्ध नॉटिंगहॅमशायर सामन्यात इसेक्सच्या खुशी फिरोझ या फलंदाजाला या नियमासाठी बॅट बदलावी लागली होती. पंचांना त्याची बॅट वेगळी असल्याचं लक्षात येईपर्यंत त्याने २१ चेंडूंत २७ धावा केल्या होत्या. इंग्लिश काऊंटी नियमांनुसार, इसेक्स संघावर या चुकीसाठी कारवाई करण्यात आली. आणि त्यांचे १२ गुण कमी करण्यात आले.

बॅटच्या आकारावरून एखाद्या फलंदाजाने फसवणूक केल्याचं अजून तरी बीसीसीआयने स्पष्ट केलेलं नाही. खबरदारी म्हणून त्यांनी नियमांत हा बदल केल्याचं दिसतंय. (IPL 2025, Bat Controversy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.