- ऋजुता लुकतुके
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयपीएल (IPL 2025) प्रशासनाला तंबाखू तसंच दारुच्या जाहिराती रोखण्याचं आवाहन केलं आहे. सामन्यांदरम्यान स्टेडिअममध्ये तसंच दूरचित्रवाणी प्रसारणातही अशा जाहिराती असू नयेत असं मंत्रालयाने म्हटलं आहे. अगदी फसव्या आणि तंबाखूजन्य उत्पादनं बनवणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातीही नसाव्यात असं मंत्रालयाचं आयपीएल प्रशासनाला सांगणं आहे. कुठल्याही कार्यक्रमात तसंच जाहिरातीत मॉडेल किंवा कुठल्याही खेळाडूने तंबाखू अथवा मद्य सेवन केलेलं दाखवू नये असं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.
येत्या २२ मार्चपासून आयपीएलचा (IPL 2025) नवीन हंगाम सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण कुमार धुमाळ (Arun Kumar Dhumal) यांना पत्र लिहून स्पर्धेच्या जागी अशा उत्पादनांची विक्री होऊ नये अशी दक्षता घेण्यास आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.
धुमाळ (Arun Kumar Dhumal) यांना लिहिलेल्या पत्रात आरोग्य मंत्रालयाने विविध व्यसनांमुळे होणारे आजार आणि ते टाळण्यासाठी केंद्रसरकार राबवत असलेली जनजागृती मोहीम यांचा उल्लेख केला आहे. या मोहिमेत आयपीएलचाही (IPL 2025) समावेश असावा अशी विनंती त्यांनी केली आहे. तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या रोगांना बळी पडणाऱ्या लोकांमध्ये भारताचा क्रमांक जगात दुसरा लागतो. भारतात तंबाखूमुळे दरवर्षी १४ लाख मृत्यू होतात. त्यामुळेही दक्षता घेण्यात येणार आहे.
Mark your calendars, folks! 🥳🗓#TATAIPL 2025 kicks off on March 2️⃣2️⃣ with a clash between @KKRiders and @RCBTweets 🤜🤛
When is your favourite team’s first match? 🤔 pic.twitter.com/f2tf3YcSyY
— IndianPremierLeague (@IPL) February 16, 2025
आयपीएल हे देशातील सगळ्यात मोठी आणि दीड महिन्याच्यावर चालणारी क्रीडा स्पर्धा आहे. आणि ती पाहण्यासाठी स्टेडिअमवर सरासरी ४० हजार लोक प्रत्येक सामन्यासाठी गर्दी करतात. अशावेळी बीसीसीआय (BCCI) आणि आयपीएल (IPL 2025) प्रशासनाने हे महत्त्वाचे संदेश पसरवण्यात हातभार लावावा अशी आरोग्य मंत्रालयाची अपेक्षा आहे.
देशात तंबाखूजन्य उत्पादनं आणि मद्याच्या जाहिराती सार्वजनिक ठिकाणी रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची एक मोहीम सुरू आहे. आणि या मोहिमेत आयपीएलही (IPL 2025) असावी अशी मंत्रालयाची इच्छा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community