IPL 2025, Karun Nair : रणजीपाठोपाठ आयपीएलमध्येही करुण नायरची चमक, ४० चेंडूंत ९० धावा
ऋजुता लुकतुके
करुण नायरसाठी (Karun Nair) यंदाचं वर्ष स्वप्नवत ठरलं आहे. आधी त्याने यंदाचा रणजी हंगाम गाजवला. आणि विदर्भाला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. आता तब्बल ७ वर्षांनंतर आयपीएलमध्ये (IPL 2025) पहिलं अर्धशतक ठोकताना त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) ४० चेंडूंत ८९ धावा केल्या. मुंबईच्या ५ बाद २०५ या धावसंख्येचा पाठलाग करताना जोपर्यंत करुण खेळपट्टीवर होता, तोपर्यंत दिल्ली कॅपिटल्सचाच (Delhi Capitals) विजय निश्चित वाटत होता. २२ चेंडूंत त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे यात जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) पहिल्याच षटकांत त्याने दोन चौकार वसूल केले. त्यानंतरच्या बुमराहच्या षटकात तर त्याने २ षटकारांसह एकूण १८ धावा वसूल केल्या. एकूण ४० धावांच्या आपल्या खेळीत त्याने ५ षटकार आणि १२ चौकार लगावले.
नायरने दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) पॉवरप्लेमध्ये तब्बल ७४ धावा वसूल केल्या. त्याच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर फक्त त्याच्याच नावाची चर्चा सुरू आहे. काहींनी करुण नायरच्या (Karun Nair) २०२२ मध्ये केलेल्या एका ट्विटचा आधार घेतला आहे. ‘प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे,’ असं ट्विट तेव्हा करुण नायरने (Karun Nair) केलं होतं. आता कष्टाने त्याने ही संधी मिळवल्याचं दिसतंय. रणजी करंडकात (Ranji Trophy) त्याने ७०० धावांचा रतीब घातला आहे. तर आयपीएलमध्ये (IPL 2025) पहिल्याच सामन्यांत खणखणीत कामगिरी केली आहे.
३३ वर्षीय करुण नायरला (Karun Nair) पुन्हा एकदा भारतीय संघात संधी मिळते का याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. २०१६ मध्ये तो भारतीय संघाकडून पहिल्यांदा खेळला. त्याला भारताकडून ६ कसोटी खेळण्याची संधी मिळाली. आणि आपल्या तिसऱ्याच कसोटी डावांत त्याने इंग्लंडविरुद्ध चिन्नास्वामी मैदानावर नाबाद ३०३ धावा केल्या होत्या. भारताकडून त्रिशतक करणारा तो वीरेंद्र सेहवागनंतरचा फक्त दुसरा भारतीय ठरला होता. पण, यानंतर त्याला खूप कमी संधी मिळाली. एकूण ६ कसोटींत तो ३७४ धावा करू शकला. तर दोनच एकदिवसीय सामन्यांत त्याच्या नावावर ४६ धावा आहेत. भारताकडून टी-२० खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र ११४ सामन्यांत त्याने ८,२११ धावा केल्या आहेत.