IPL 2025, MI vs KKR : अखेर घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचं नशीब फळफळलं, कोलकाताचा ८ गडी राखून पराभव

IPL 2025, MI vs KKR : पदार्पणात अश्विनी कुमारने ४ बळी घेतले

75
  • ऋजुता लुकतुके

पहिल्या सामन्यातील पराभवांनंतर मुंबई इंडियन्सचा संघ (IPL 2025, MI vs KKR) काही दिवस संघ बांधणीसाठी जामनगरला राहिला होता. त्यानंतर अहमदाबादमधील गुजरात टायटन्सविरुद्घचा सामना मुंबईने गमावलाच. पण, आता घरच्या मैदानावर पराभवांची ही मालिका खंडित करण्यात मुंबई इंडियन्सला यश आलं. या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजांचं संपूर्ण वर्चस्व एखाद्या डावावर पहायला मिळालं. नाणेफेक जिंकून हार्दिकने कोलकाता नाईट रायडर्सला पहिली फलंदाजी दिल्यावर पहिल्या चेंडूपासून त्यांच्यावरील दडपण वाढवण्यात मुंबई यशस्वी ठरली. अखेर हा सामना मुंबईने ८ गडी आणि ४३ चेंडू राखून जिंकला.

सामन्याच्या चौथ्याच चेंडूवर धोकादायक सुनील नरेन शून्यावर बाद जाला. आणि त्याच्या पुढच्याच षटकांत दीपक चहरने दुसरा सलामीवीर क्विंटन डी कॉकला बाद केलं. त्यानंतर सुरू झाला नवोदित अश्विनी कुमारचा शो. पंजाबच्या या २३ वर्षीय गोलंदाजाने वेगांत वेळोवेळी बदल करत आणि अचूक यॉर्करच्या मदतीने कोलकाताची मधली फळी कापून काढली. त्याने अजिंक्य रहाणे (११), रिंकू सिंग (१७), मनिष पांडे (१९) आणि आंद्रे रसेल (५) यांना बाद केलं. कोलकात्यासाठी वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या होती अंगक्रिश रघुवंधीची २६. बाकी फलंदाज जम बसवू शकले नाहीत. आणि भागिदारीही झाली नाही. उलट मुंबईची गोलंदाजी अचूक होती. दीपक चहरनेही १९ धावांत २ बळी मिळवले. कोलकाताचा संघ १६ षटकांतच ११६ धावांत सर्वबाद झाला. (IPL 2025, MI vs KKR)

(हेही वाचा Disha Salian चा खून झाल्याचा दर्शवणारे महत्त्वाचे पुरावे लागले हाती)

मुंबईसाठी टी-२० सामन्यात षटकामागे ६ धावांपेक्षा कमी धावगतीने धावा करायच्या होत्या. पण, रोहीत शर्मा आणि रिकलटन यांना विजयाची घाई होती. दोघांनी सहाव्या षटकांतच ४६ धावांची सलामी मुंबईला करून दिली. दोघांमध्ये रिकलटन जास्त आक्रमक होता. रोहीत शर्मा मात्र १३ धावा करुन पुन्हा एकदा चुकीचा फटका खेळून बाद झाला. रिकलटन मात्र फॉर्मात होता. आणि त्याने ४१ चेंडूत ६२ धावा केल्या. यात ५ षटकार आणि ४ चौकार होते. (IPL 2025, MI vs KKR)

रसेलच्या गोलंदाजीवर विल जॅक्स १६ धावा करून बाद झाला. पण, त्यानंतर सुर्यकुमार यादव (नाबाद २७) आणि रिकलटन यांनी अधिक पडझड होऊ दिली नाही. या हंगामात कोलकाता संघाचा तीन सामन्यांत हा दुसरा पराभव आहे. तर मुंबई इंडियन्सनी दोन पराभवांनंतर पहिला विजय मिळवला आहे. गुणतालिकेत आता कोलकाता संघ सातव्या क्रमांकावर तर मुंबई संघ सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. (IPL 2025, MI vs KKR)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.