
-
ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्सनी रविवारी दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव करून आपली पराभवांची मालिका खंडित केली. तर दिल्लीला या हंगामातील पहिल्या पराभवाची चव चाखायला लावली. या विजयात अखेरच्या षटकात गेलेल्या ३ धावचित बळीचं मोठं योगदान होतं. त्यासाठी माजी कर्णधार रोहित शर्माचा एक सल्ला मुंबई इंडियन्सना उपयोगी पडल्याचं आता बोललं जातंय. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माच योग्य कप्तान आहे का, हा वाद पुन्हा सुरू झालाय. मैदानाबाहेरच हा वाद जास्त रंगलाय. या वादात उतरले आहेत सामन्याचं समालोचन करणारे संजय मांजरेकर आणि संजय बांगर हे दोन माजी भारतीय खेळाडू. (IPL 2025, Mumbai Indians)
मुंबईच्या ५ बाद २०५ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ करुण नायरच्या फटकेबाजीच्या जोरावर चांगला प्रतिकार करत होता. इतक्यात १३ व्या षटकानंतर झालेल्या स्ट्रॅटजिक टाईम आऊटमध्ये मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने, गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि हार्दिक पांड्या तसंच रोहित शर्मा हे चौघे मैदानावर चर्चा करताना दिसले. या चर्चेदरम्यान रोहितने हार्दिकला दुसरा नवीन चेंडू घेण्याचा तसंच करण शर्माला गोलंदाजीला आणण्याचा सल्ला दिला, असं आता बोललं जातंय. (IPL 2025, Mumbai Indians)
(हेही वाचा – IPL 2025, Rohit Sharma : ‘रोहितच कर्णधार हवा’; चाहत्याच्या या म्हणण्यावर संघमालक नीता अंबानींनी दिलं ‘हे’ उत्तर)
हाच निर्णय सामन्याला कलाटणी देणारा ठरला. कारण, नवीन चेंडूवर ट्रिस्टियन स्टब्ज आणि के. एल. राहुल हे फॉर्मात असलेले फलंदाज लागोपाठ बाद झाले आणि तिथून पुढे दिल्लीचा संघ १९३ धावांत सर्वबाद झाला. या निर्णयावरून स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर समालोचन करताना बांगर आणि मांजरेकर यांच्यातच जुंपली. ‘या निर्णयाचं श्रेय रोहितला दिलं पाहिजे. त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला हवी,’ असं उत्स्फूर्तपणे संजय बांगर म्हणला. (IPL 2025, Mumbai Indians)
त्याला संजय मांजरेकर यांनी लागलीच विरोध केला. ‘बाहेर बसून सल्ला देणं सोपं असतं. पण, हाच निर्णय संघाच्या विरोधात गेला असता तर हार्दिकवर लोकांनी ताशेरे ओढले असते. कर्णधारच अंतिम निर्णय घेतो. त्यामुळे सगळं श्रेय त्यालाच दिलं पाहिजे. सर्वाधिक दडपण त्याच्यावर होतं आणि अशावेळी त्याने तो निर्णय घेतला. श्रेय त्याचंच आहे,’ असं संजय मांजरेकर यावर म्हणाला. मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांना दोन वर्षांपूर्वी रोहितची कप्तानी काढून घेऊन ती हार्दिककडे देण्याचा निर्णय रुचलेला नाही. त्यामुळे जाहीरपणे बांगर आणि मांजरेकर यांच्यात झालेल्या वादानंतर आता मुंबईकर चाहतेही दोन्ही बाजूंनी चर्चा करू लागले आहेत. (IPL 2025, Mumbai Indians)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community