ऋजुता लुकतुके
पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यात संध्याकाळी एक वादळ मैदानात घोंधावत आलं. हे वादळ होतं प्रियांश आर्य या २४ वर्षीय दिल्लीकर फलंदाजाने ठोकलेले ९ षटकार आणि ७ चौकारांचं. आयपीएलच्या इतिहासातील भारतीयाने केलेलं दुसरं वेगवान शतक त्याने पूर्ण केलं. ४२ चेंडूंत १०३ धावा करताना त्याने चेन्नईच्या गोलंदाजीची पार हवाच काढून घेतली. विशेष म्हणजे तो एका बाजूने फटकेबाजी करत असताना दुसऱ्या बाजूने एकेक फलंदाज त्याची साथ सोडत होता. पंजाबची अवस्था अक्षरश: १ बाद १७, २ बाद ३२, ३ बाद ५४ आणि ५ बाद ८३ अशी होती. पण, त्याने प्रियांशला फरक पडत नव्हता. तो धावा भराभर वाढवत होता. अखेर सातव्या क्रमांकावर आलेल्या शशांक सिंगने नाबाद ५४ धावा करत प्रियांशला साथ दिली. आणि त्यामुळे पंजाब संघानेही द्विशतक पूर्ण केलं.
यापूर्वी युसुफ पठाणने २०१० साली ३७ चेंडूंत शतक ठोकलं होतं. त्यानंतर प्रियांशचं हे शतक दुसरं वेगवान शतक ठरलं आहे. इतकंच नाही तर या शतकामुळे जलद आयपीएल शतकांच्या यादीत आता प्रियांश ख्रिस गेल, ट्रेव्हिस हेड यांच्याबरोबर जाऊन बसला आहे.
आयपीएलमधील सर्वात जलद शतकं,
ख्रिस गेल (बंगळुरू) वि. पुणे वॉरियर्स (बंगळुरू २०१३) – ३० चेंडू
युसुफ पठाण (राजस्थान) वि. मुंबई इंडियन्स (मुंबई २०१०) – ३७ चेंडू
डेव्हिड मिलर (पंजाब) वि. बंगळुरू (मोहाली २०१३) – ३८ चेंडू
ट्रेव्हिस हेड (हैद्राबाद) वि, बंगळुरू (बंगळुरू २०२४) – ३९ चेंडू
प्रियांश आर्य (पंजाब) वि. चेन्नई (मुल्लनपूर २०२५) – ३९ चेंडू
हेही वाचा- Pune Rape Case : पुण्यात भूतानच्या तरुणीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक
प्रियांशने आयपीएलमध्य पहिल्यांदाच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असलं तरी दिल्लीच्या स्थानिक वर्तुळात तो सगळ्यांना ठाऊक आहे. दिल्ली प्रिमिअर लीगमध्ये पठ्ठ्याने ६ चेंडूंत ६ षटकार ठोकण्याची लक्षवेधी कामगिरी केली होती. तेव्हाच आयपीएल फ्रँचाईजींचं लक्ष त्याने आपल्याकडे वेधून घेतलं. त्या सामन्यात त्याने ५० चेंडूंत १२५ धावा केल्या होत्या. हा डावखुरा फलंदाज स्फोटक फलंदाजीसाठीच ओळखला जातो. २०२४ मधील या कामगिरीनंतर मेगा लिलावात त्याच्यावर संघ मालकांच्या उड्या पडल्या होत्या. आणि अननुभवी खेळाडूंच्या श्रेणीत असतानाही त्याच्यावर बोली वाढत गेली. आणि शेवटी पंजाब किंग्ज संघाने ३.८ कोटी रुपयांत त्याला विकत घेतलं. ही किंमत या शतकाने आता त्याने सार्थ ठरवली आहे.
२०२४-२५ च्या हंगामात सय्यद अली टी-२० स्पर्धेतही तो दिल्लीचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. आणि एका सामन्यांत त्याने ४३ चेंडूंत १०२ धावा केल्या होत्या. तो नैसर्गिक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. आर अश्विनलाही आपल्या फटेकाबाजीने त्याने भुरळ घातली होती. २००१ मध्ये जन्मलेल्या प्रियांशने २००१ मध्ये दिल्ली संघाकडून पदार्पण केलं आहे. राष्ट्रीय संघातून न खेळलेल्या ज्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये शतक केलं आहे अशा खेळाडूंच्या यादीत आता प्रियांश विराजमान झाला आहे.
आयपीएलमध्ये शतक झळकावणारे अननुभवी खेळाडू,
शॉन मार्श वि. राजस्थान रॉयल्स, २००८
मनिष पांडे वि. डेक्कन चार्जर्स, २००९
पॉल वल्थाटी वि. चेन्नई सुपर किंग्ज, २००९
देवदत्त पड्डिकल वि. राजस्थान रॉयल्स, २०२१
रजत पाटिदार वि. लखनौ सुपर जायंट्स, २०२२
यशस्वी जयसवाल वि. मुंबई इंडियन्स, २०२२
प्रभसिमरन सिंग वि. दिल्ली कॅपिटल्स, २०२३
प्रियांश आर्य वि. चेन्नई सुपरकिंग्ज, २०२५
हेही पहा-
Join Our WhatsApp Community