-
ऋजुता लुकतुके
एकीकडे आयपीएलमध्ये (IPL 2025) घरच्या मैदानावरील खेळपट्टीची मदत मिळण्यावरून वाद सुरू आहे. कोलकाता संघाने घरच्या मैदानाचा फायदा उठवू शकत नसल्याची तक्रार केली. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अगदी सुरुवातीपासून घरच्या मैदानाचा फायदा उठवता आलेला नाही. उलट घरचं मैदान त्यांच्यासाठी काही वेळा शापच ठरलं आहे. घरच्या मैदानावर बंगळुरू संघ ३ पैकी १ सामनाच जिंकतो असा लौकिक आहे. गुजरातविरुद्धही तेच झालेलं पाहायला मिळालं. चिन्नास्वामी मैदानावर सीमारेषा जवळ आहे. आणि चेंडू इथं उसळतोही. त्यामुळे फलंदाज फटके चांगल्या पद्धतीने खेळू शकतात. तेच गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs GT) यांच्यातील सामन्यात झालं. मात्र फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर सुरुवातीला बंगळुरूची फलंदाजी कोसळली आणि त्याचा फटका त्यांना बसला.
विराट कोहली (Virat Kohli) ७ धावा करून दुसऱ्याच षटकात बाद झाला. पाठोपाठ देवदत्त पडिक्कल (२), रजत पाटीदार (१२) आणि फिल सॉल्ट (१४) बाद झाले आणि बंगळुरूची अवस्था ४ बाद ४५ अशी झाली. त्यानंतर लियाम लिविंगस्टोन (५४) आणि जितेश शर्मा (३३) यांनी भागिदारी करत निदान दीडशे धावसंख्या होईल अशी सोय केली. पण, या खेळपट्टीवर या धावाही कमीच होत्या. मोहम्मद सिराज गेल्या हंगामात बंगळुरूकडून खेळत होता. पण, यंदा त्याला फ्रँचाईजीने वगळलं. त्याचं उट्टं काढत सिराजने १९ धावांत ३ बळी घेतले. तर साई किशोरनेही (Sai Kishore) २२ धावांत २ बळी घेतले.
(हेही वाचा – BMC : खासगी सहभाग तत्वावरील रुग्णालयांमध्ये महापालिकेचे रुग्ण कोण? कुणाला मिळणार मोफत उपचार?)
Match 14. Gujarat Titans Won by 8 Wicket(s) https://t.co/teSEWkXnMj #RCBvGT #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2025
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांच्याकडून आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती जाहीर)
जोश हेझलवूड, भुवनेश्वर यांच्या रुपाने बंगळुरू संघाकडेही चांगले तेज गोलंदाज होते. पण, त्यांना सुरुवातीलाच गुजरातच्या फलंदाजांना आवर घालणं शक्य झालं नाही. शुभमन गिल (Shubman Gill) (१४) त्याच्या स्वत:च्या चुकीने बाद झाला. पण, त्यानंतर जोस बटलर (Jos Buttler) आणि साई सुदर्शन (Sai Sudharsan) ही जोडी जमली. साई सुदर्शन ३६ चेंडूंत ४९ धावा करून बाद झाला. पण, त्यानंतर जोस बटलरने (Jos Buttler) खेळाची सूत्र आपल्या हातात घेतली. आणि ३९ चेंडूंत नाबाद ७३ धावा करताना ६ षटकारांची आतषबाजी केली. सुदर्शन बाद झाल्यावर गुजरात संघाने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून शर्फेन रुदरफोर्डला मैदानात उतरवलं. त्यानेही नाबाद ३० धावा करताना ३ षटकारांची आतषबाजी केली.
बंगळुरूने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून रसिक सलामला (Rasikh Salam) मैदानात उतरवलं खरं. पण ही रणनीती अपयशी ठरली. त्याने ३ षटकांत ३५ धावा दिल्या. या पराभवामुळे बंगळुरूची या हंगामातील विजयी मालिका संपुष्टात आली आहे. तर गुजरात टायटन्सनी आपला दुसरा विजय साजरा केला आहे. आयपीएल (IPL 2025) गुणतालिकेत आता बंगळुरू संघ तिसऱ्या आणि गुजरात टायटन्स चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community