-
ऋजुता लुकतुके
भारताचा आणि मुंबईचा माजी फिरकीपटू साईराज बहुतुलेनं बीसीसीआयच्या बंगळुरूतील क्रिकेट अकादमीतील गोलंदाजीचा प्रशिक्षक हे पद सोडल्यानंतर अपेक्षेप्रमाणेच आयपीएल फ्रँचाईजीची जबाबदारी स्वीकारली आहे. नवीन आयपीएल हंगामात तो राजस्थान रॉयल्स संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षख असेल. गेल्या महिन्यात ३१ जानेवारीला तो क्रिकेट अकादमीतील जबाबदारीतून मुक्त झाला आहे. घरगुती कारणांमुळे हे पद सोडत असल्याचं बहुतुलेनं म्हटलं होतं. २०२१ पासून साईराज बहुतुले क्रिकेट अकादमीत कार्यरत होता. राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण क्रिकेट अकादमीचे प्रमुख असताना बहुतुलेनं दोघांच्या हाताखाली काम केलं आणि त्याच्या कारकीर्दीत अनेक नवीन खेळाडू भारतीय संघात उदयास आले. (IPL 2025)
(हेही वाचा – Mahalaxmi Express च्या एसी डब्याला आग, प्रवाशांनी चेन ओढली आणि …)
‘मी मुंबईत परततोय हे खरं आहे. घरगुती कारणांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला आहे. पण, इथं काम करण्याची संधी मला मिळाली आणि राहुल द्रविड, लक्ष्मण यांनी कामाचं स्वातंत्र्य मला दिलं याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. भारतीय संघ, भारतीय ए संघ तसंच १९ वर्षांखालील भारतीय संघाबरोबर मी एकूण २० दौरे केले. आणि हा कालावधी कायम आठवणीत जपण्यासारखा आहे,’ असं बहुतुलेनं बोलून दाखवलं होतं. या राजीनाम्यानंतर बहुतुले मुंबई इंडियन्स बरोबर काम करेल असं आधी बोललं जात होतं. पण, त्याने आपला क्रिकेट अकादमीतील जुना नेता राहुल द्रविड बरोबर राजस्थान रॉयल्समध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. राहुल द्रविड राजस्थानचा मुख्य मार्गदर्शक आहे. (IPL 2025)
(हेही वाचा – Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल मुंबईकडून उपान्त्य फेरीत खेळणार)
भारताने एकदिवसीय विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला तेव्हा साईराज बहुतुले संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघाबरोबर होता. तर १९ वर्षांखालील विश्वचषकात शेवटच्या दोन स्पर्धांमध्ये त्याने युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलं आहे. गेल्यावर्षी इंडिया इमर्जिंग संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही तो ओमान इथे झालेल्या स्पर्धेत संघाबरोबर सहभागी झाला होता. तर श्रीलंकेत गेल्यावर्षी झालेल्या मालिकेतही तो भारतीय सीनिअर संघाबरोबर होता. फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये झालेल्या बोर्डर-गावस्कर मालिकेतही तो भारतीय संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक होता. साईराज भारताकडून २ कसोटी आणि ८ एकदिवसीय सामने खेळला आहे. कसोटींत त्याच्या नावावर ५ बळी आहेत. प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये मात्र त्याने १८८ कसोटींत एकूण ६३० बळी मिळवले आहेत आणि ६,१७६ धावाही केल्या आहेत. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community