-
ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या मेगा लिलावात तेज गोलंदाज शार्दूल ठाकूरसाठी एकाही संघाने बोली लावली नव्हती. पण, आता मोहसीन खानला झालेल्या दुखापतीमुळे शार्दूलला लखनै सुपर जायंट्सकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. लखनौ संघाच्या सराव शिबिरात शार्दूल आधीपासून दाखल झाला आहे. पण, मोहसीन खानची अनुपलब्धता अधिकृत झाल्यावर आयपीएलचे नियम तपासून आता शार्दूलला संघात शामील करण्याची प्रक्रिया नक्की करण्यात आली आहे. अजूनही याची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण, विशाखापट्टणमच्या पहिल्या सामन्यापासून शार्दूल संघाबरोबर असेल. त्याला तसं कळवण्यात आल्याचं समजतंय. यंदा रिषभ पंत लखनौ फ्रँचाईजीचं नेतृत्व करणार आहे. (IPL 2025)
(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलच्या नवीन हंगामात बदललेले आणि कायम राहिलेले सर्व नियम एका दृष्टीक्षेपात)
मोहसीन खानला एसीएल दुखापतीमुळे मागचे तीन महिने क्रिकेटपासून लांब रहावं लागलं होतं. त्यानंतर तो लखनौच्या नेट्समध्ये सहभागी झाला. पण, तितक्यात त्याच्या पायाची पोटरी दुखावली. दुखापतीचं परीक्षण झाल्यानंतर तो अख्खा हंगाम खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर मग शार्दूलच्या समावेशाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मोहसीन बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत सध्या सराव करत आहे. (IPL 2025)
(हेही वाचा – Largest Population: धोक्याची घंटा ! २०५० मध्ये भारत होणार सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेला देश)
लखनौ संघाचा तेज तोफखाना आधीच भक्कम आहे. संघात आकाशदीप, आवेश खान, मयंक यादव हे खेळाडू आधीपासून मौजूद आहेत. पण, मयंक खान अजूनही दुखापतग्रस्त आहे आणि हंगामातील सुरुवातीचे सामने तो खेळणार की नाही हे अनिश्चित आहे. आकाशदीप आणि मयंक दोघेही बंगळुरूत आपापल्या दुखापतींवर उपचार आणि त्यानंतरच्या पुनर्वसन कार्यक्रमात मग्न आहेत. तर आवेश खानही घोट्याच्या दुखापतीतून नुकता सावरतोय. त्यामुळे चार गोलंदाजांची फळी असतानाही लखनौला तेज गोलंदाजांची उणीव भासत होती. ती कमी आता शार्दूल पूर्ण करेल. यंदाच्या रणजी हंगामात शार्दूलने बॅट आणि चेंडूनेही मुंबईसाठी कमाल केली आहे. खासकरून उपउपांत्य आणि उपांत्य सामन्यात शार्दूलने एका शतकासह डावांत पाच बळी घेण्याची कामगिरी दोनदा केली आहे. लखनौचा पहिला सामना विशाखापट्टणम इथं दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. (IPL 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community