IPL आणि घरच्या खेळपट्टीचा वाद !

50
IPL आणि घरच्या खेळपट्टीचा वाद !
IPL आणि घरच्या खेळपट्टीचा वाद !

ऋजुता लुकतुके

२००८ साली आयपीएलची (IPL) स्थापना झाली, तेव्हापासून या लीगचा पाया एका महत्त्वाच्या गोष्टीवर बांधला गेला आहे. युरोपीयन फुटबॉल लीगमध्ये असतं तसं फ्रँचाईजी मॉडेल इथं असेल. म्हणजे प्रत्येक फ्रँचाईजी किंवा संघाचं एक केंद्र असेल. जसं मुंबई इंडियन्सचं केंद्र असेल मुंबई, चेन्नई सुपरकिंग्जचं चेन्नई, कोलकाता नाईट रायडर्सचं कोलकाता इत्यादी.

स्पर्धेची रचनाही अशी आहे की, प्रत्येक संघ प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एक सामना आपल्या ‘घरच्या मैदानावर’ आणि एक प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर खेळतो. अशा वेळी संघ मालकांना ‘आपल्या मैदानावर’ सामन्याचा माहौल तयार करता येतो. शिवाय घरचं मैदान ठरलेलं असेल तर तिथली खेळपट्टी, वातावरण हे संघातील खेळाडूंना लगेच अंगवळणी पडतं. फक्त आयपीएलच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटही या गृहितकावर आधारित आहे.

(हेही वाचा – Weather Update : उन्हाचा चटका वाढणार; ‘या’ राज्यांमधील उष्णतेची लाट तीव्र होणार)

थोडक्यात काय, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असतं तसंच महत्त्व आयपीएलमध्येही (IPL) काही प्रमाणात का होईना घरच्या मैदानांना आहे. पण, या समजुतीला यंदा एका उदाहरणाने तडा गेला. कोलकाता नाईट रायडर्स हा गतविजेता संघ ईडन गार्डन्स या ‘घरच्या मैदानावर’ आपला पहिलाच सामना हरला. आणि सामन्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) एक गोष्ट बोलून दाखवली, ‘क्युरेटर सुजल मुखर्जी यांनी फिरकीला पोषक खेळपट्टी बनवण्याची केलेली विनंती ऐकली नाही.’ कोलकाता संघाकडे वरुण चक्रवर्ती (Varun Chakaravarthy) आणि सुनील नरेन (Sunil Narine) हे दोन खंदे फिरकीपटू आहेत. कोलकाताने घरच्या मैदानावर संघाला पोषक खेळपट्टी बनवण्याची अपेक्षा केली, तर चुकलं कुठे हा मुद्दा आहे.

ईडन गार्डन्सचे क्युरेटर सुजल मुखर्जी यांचं म्हणणं होतं, ‘मी कोलकाता नाईट रायडर्सचा नोकर नाही आणि खेळपट्टी तयार करणं हे कर्णधाराचं काम नाही. मला निर्देश देण्याचा अधिकार फक्त बंगाल क्रिकेट असोसिएशनचा आहे.’

(हेही वाचा – Jalgaon मध्ये बोगस जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नोंदप्रकरणी ४३ बांगलादेशी घुसखोरांवर गुन्हा दाखल)

कुठलाही खेळ हा सर्व प्रतिस्पर्ध्यांना समसमान संधी देणारा हवा, असा नियम आहे. त्यामुळे संघ विशिष्ट प्रकारच्या खेळपट्टीची मागणी करू शकत नाही, हे जितकं खरं आहे. तितकंच क्रिकेट या खेळाचं अंगभूत वैशिष्ट्य असं आहे की, खेळपट्टी कशी तयार केली जाते यावरच अनेकदा विजयाचं गणित ठरतं आणि त्यामुळे खेळपट्टीला महत्त्व आहे. भारतातील खेळपट्ट्या या अगदी परंपरेनं फिरकीला पोषक आहेत. तर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात याच खेळपट्ट्या वेगवान आणि उसळत्या असतात. त्यामुळे त्या तेज गोलंदाजांना साथ देणाऱ्या असतात. या खेळाचा स्वभावच तो आहे. भारताला भारतात फिरकीपटूंसाठी बनवलेल्या खेळपट्टींची मदत मिळणार आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात उसळत्या खेळपट्ट्यांची मदत मिळणार, हे बदलता येणार नाही.

शिवाय, बीसीसीआयने (BCCI) आयपीएलची (IPL) स्थापना केली, तेव्हाच फ्रँचाईजींना मैदानं नेमून दिलेली आहेत आणि तिथे सामन्याचं आयोजन करण्यासाठी प्रत्येक फ्रँचाईजी त्या त्या क्रिकेट असोसिएशनला प्रत्येक सामन्यापोटी ६० लाख रुपये इतकं भाडं देत असते. अशावेळी आयपीएल (IPL) पुरतं तरी हे मैदान फ्रँचाईजीचं नाही असं तरी कसं म्हणायचं? आयपीएलमध्येही (IPL) घरच्या मैदानावर संघांनी जिंकण्याचं प्रमाण तब्बल ७६.९६ टक्के इतकं आहे.

(हेही वाचा – भारतातील पहिल्या उभ्या समुद्री पुलाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते उद्घाटन)

खेळपट्टीचं प्रमाणीकरण की, सानुकूलन म्हणजेच कस्टमायझेशन हा या आयपीएलचा (IPL) पहिल्या टप्प्यातील वाद ठरला आहे. कारण, बीसीसीआयने (BCCI) मधल्या काळात आपल्याकडील खेळपट्ट्यांचा दर्जा सुधारण्याचं मनावर घेतलं, तेव्हा त्यांनी प्रमाणीकरणावर भर दिला. खेळपट्ट्या कसोटीचे पाचही दिवस खेळण्यायोग्य असाव्या, त्यावर फलंदाज आणि गोलंदाजांना समसमान संधी असावी, वर्षातील पावसाळ्याचा हंगाम सोडता इतर दिवसांत कायम ती खेळण्यायोग्य असावी, बॅट आणि चेंडू यांच्यातील द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळावं, सामने एकतर्फी होऊ नयेत हा त्यामागचा हेतू होता. ईडन गार्डन्सचे क्युरेटर यांनी रहाणेशी बोलताना वापरलेली भाषा ही या धोरणाला अनुसरून आहे.

पण, बीसीसीआयचं (BCCI) हे धोरण असतानाही भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेचा अपवाद सोडला, तर इतर मालिका भारतात जिंकलाच आहे आणि पोषक खेळपट्ट्या हेच कारण बहुतांशी त्यामागे होतं. आताही कोलकाता नाईट रायडर्सचा संघ तशीच मागणी करतो आहे आणि क्युरेटरच्या धोरणामुळे त्याचं नुकसान होतंय, असं त्यांना वाटतंय.

(हेही वाचा – धर्मावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही; Raj Thackeray, Jitendra Awhad यांच्याविरोधात संत समितीच्या बैठकीत ठराव)

खेळपट्टी वादावर आतापर्यंत कोण काय काय बोललं?

आयपीएलमध्ये कोलकाता हा एकमेव संघ असा आहे की, त्यांना घरचं मैदानच नाही.’
– नितिश राणा
(कोलकाता फ्रँचाईजीचा माजी कर्णधार)

आम्हाला फिरकीला पोषक खेळपट्टीवर खेळायला आवडेल. पण, ईडन गार्डन्स दोन दिवस आच्छादलेलं होतं.’
अजिंक्य रहाणे
(कोलकाता फ्रँचाईजीचा कर्णधार)

घरच्या मैदानावर खेळण्याचा थोडासा फायदा आम्हाला मिळाला तर बिघडलं कुठे? थोडा तरी फायदा आम्हाला मिळावा.’
– चंद्रकांत पंडित
(फ्रँचाईजीचे मुख्य प्रशिक्षक)

कोलकाता फ्रँचाईजीने आपलं घरचं मैदान बदलून घेण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते.
– सायमन डूल
(न्यूझीलंडचा माजी खेळाडू)

प्रत्येकच संघाला घरच्या मैदानाचा फायदा उठवायचा असतो. कोलकाता संघाने
तशी मागणी करणं चूक नाही.’
– अरुण लाल
(माजी भारतीय क्रिकेटपटू)

आयपीएलच्या नियमावलीनुसार, फ्रँचाईजी खेळपट्टी विषयी मला काहीही सांगू शकत नाहीत.
– सुजल मुखर्जी
(ईडन गार्डन्स खेळपट्टी क्युरेटर)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.