IPL Auction 2024 : खेळाडूंच्या लिलावात कमिन्स, ब्रूक यांच्यावर लक्ष 

आयपीएलच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी दुपारी अडीच वाजता दुबईत होणार आहे 

235
IPL Auction 2024 : खेळाडूंच्या लिलावात कमिन्स, ब्रूक यांच्यावर लक्ष 
IPL Auction 2024 : खेळाडूंच्या लिलावात कमिन्स, ब्रूक यांच्यावर लक्ष 

ऋजुता लुकतुके

आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2024) मंगळवारी दुबईच्या कोका कोला अरेनामध्ये पार पडणार आहे. लीगमधील दहा संघांकडे मिळून २६२ कोटी रुपये शिल्लक आहेत. ७० जागा भरायच्या आहेत. त्यामुळे हा लिलाव मोठया बोलींचा ठरणार हे नक्की आहे. खेळाडूंना आपली मूलभूत किंमत ठरवता येते. आणि ही रक्कम २ कोटी रुपयांपर्यंत असू शकते.

या लिलावात कुठल्या खेळाडूंवर संघांच्या उड्या पडण्याची शक्यता आहे, यावर एक नजर टाकूया,

(हेही वाचा-China Earthquake : १११ जणांचा मृत्यू, मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु)

पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)

३० व्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करताना पॅट कमिन्सने आपला समजूतदारपणा दाखवून दिला आहे. तर तेज गोलंदाज म्हणून आपली उपयुक्तताही सिद्ध केली आहे. एकदिवसीय विश्वचषक आणि ॲशेस मालिकेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तो आधीच्या आयपीएल हंगामात खेळला नव्हता. पण, आता तो सहभागी होतोय तेव्हा त्याच्या भोवती एक वेगळंच वलय आहे. अचूक गोलंदाजी आणि आवश्यक तेव्हा नेटाने केलेली फलंदाजी या त्याच्या जमेच्या बाजू आहेत. त्याची मूलभूत किंमत आहे २ कोटी रुपये.

रचिन रवींद्र (न्यूझीलंड)

न्यूझीलंडचा हा सलामीवीर विश्वचषकानंतर (IPL Auction 2024) घराघरात पोहोचला आहे. सर्वात जास्त धावांसाठी शेवटच्या सामन्यापर्यंत त्याची विराट कोहलीशी स्पर्धा होती. २४ वर्षांच्या रचिनच्या नावावर विश्वचषकात ३ शतकं आणि मोक्याच्या क्षणी फिरकीने घेतलेले १० बळीही आहेत. त्याची मूलभूत किंमत ५० लाख रुपये असली तरी बोली लागल्यावर ही किंमत कोटींची उड्डाणं घेईल हे नक्की आहे.

हॅरी ब्रूक (इंग्लंड)

हॅरी ब्रूक हा इंग्लिश फलंदाज खरंतर तीनही प्रकारात अव्वल कामगिरी करतोय. अलीकडे विश्वचषकात तो फारशी छाप पाडू शकला नसला, तरी घणाघाती फलंदाजीमुळे टी-२० हा त्याचा प्रकार मानला जातो. आणि आयपीएलमध्येही त्याच्या नावाची चर्चा होतेच. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. आणि त्याला संघात घेण्याची प्रत्येक संघाची इच्छा असणार आहे.

गेराल्ड कोत्झीए (द आफ्रिका)

या विश्वचषकात गेराल्ड कोत्झीएच्या नावाची चर्चा प्रत्येक सामन्यात झाली. २३ वर्षीय कोत्झीए हा शॉन पोलॉकच्या दर्जाचा गोलंदाज मानला जातो. यंदाच्या विश्वचषकातही त्याने २० बळी टिपून पहिल्या पाच यशस्वी गोलंदाजांत स्थान मिळवलं. त्याची मूळ किंमत २ कोटी आहे. आणि बोली लागल्यावर ती किती पटीने वाढते एवढाच प्रश्न आहे.

वानिंदू हसरंगा (श्रीलंका)

श्रीलंकेच्या लेगस्पिनरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अलीकडेच संघातून मुक्त केलं. विश्वचषकात तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण, त्याच्या नावाचा आणि कामगिरीचा (IPL Auction 2024) जलवा कमी झालेला नाही. प्रभावी फिरकी आणि हुकमी बळी टिपण्याची हातोटी यासाठी तो ओळखला जातो. दीड कोटी रुपयांची मूळ किंमत असलेला हा खेळाडू भारतीय खेळपट्टयांवर हवा हवासा वाटणार आहे.

जे भारतीय खेळाडू या लिलावात छाप पाडू शकतात ते आहेत शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, हर्षल पटेल, उमेश यादव आणि चेतन सकारिया.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.