IPL Mega Auction : युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने खरंच वय चोरलंय? लिलावात कोट्यधीश ठरल्यावर पुन्हा टीका सुरू

IPL Mega Auction : वैभवच्या वडिलांनी मात्र वय चोरण्याचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

59
IPL Mega Auction : युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने खरंच वय चोरलंय? लिलावात कोट्यधीश ठरल्यावर पुन्हा टीका सुरू
  • ऋजुता लुकतुके

सौदी अरेबियात जेद्दाह इथं पार पडलेल्या लिलावात रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरवर सर्वाधिक बोली लागली. पण, रविवारी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते बिहारच्या वैभव सूर्यवंशीने. १३ वर्षं आणि ८ महिन्यांच्या वैभववर राजस्थान रॉयल्सने १.१ कोटी रुपयांची बोली लावली आणि त्याला ताफ्यात घेतलं. वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी वैभवला खेळता यावं यासाठी शेतजमीन विकली होती. त्यानंतर ३ वर्षांतच वैभवने वडिलांच्या त्यागाची कितीतरी पटींनी परतफेड केली आहे. (IPL Mega Auction)

पण, भारतीय क्रिकेटमधील सगळ्यात लहान कोट्याधीश खेळाडू होण्याबरोबरच एक जुनाच वाद पुन्हा एकदा वर आला आहे. वैभववर याही पूर्वी वय चोरल्याचा आरोप झाला होता. ती चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. पण, त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. लिलावानंतर मीडियाशी बोलताना ते म्हणाले, ‘८ वर्षांचा असताना बिहारच्या १६ वर्षांखालील संघात त्याची निवड झाली. तेव्हा बिहार क्रिकेट असोसिएशनचे त्याची चाचणी केली होती आणि तो ८ वर्षांचा असल्याचा निर्वाळा दिला होता. आम्ही वय लपवलेलं नाही. कुठल्याही चौकशीसाठी आम्ही तयार आहोत.’ (IPL Mega Auction)

(हेही वाचा – Water Cut : मुंबईतील ‘या’ भागात गुरुवार, शुक्रवारी २२ तासांचा पाणी ब्लॉक)

शिवाय वैभव यापूर्वीच भारताकडून १९ वर्षांखालील संघात खेळला आहे. त्यामुळे वयावर संशय घेण्याचं कारण नाही, असं संजीव यांचं म्हणणं आहे. ‘अधिकृतपणे तशी मागणी झाली तर वय सिद्ध करायलाही आम्ही तयार आहोत. आमच्याकडे असलेल्या ओळखपत्रांवर त्याचं वय १३ वर्षं ८ महिने असंच आहे. बाकी इतरांनी यावर जास्त चर्चा करू नये,’ असं सोमवारी संजीव सूर्यवंशी मीडियाशी बोलताना म्हणाले. (IPL Mega Auction)

वैभवला कोट्याधीश झाल्याचं अजून नीट कळलेलं नाही, असंही संजीव सांगतात. ‘त्या मुलाला फक्त क्रिकेट आवडतं. आणि खेळणं एवढाच त्याचा ध्यास आहे. १ कोटी वगैरे आकडे त्याला समजत नाहीत. आम्हालाही त्याने क्रिकेट खेळावं एवढंच वाटतं. बाकीच्या गोष्टी या खेळा इतक्या महत्त्वाच्या नाहीत,’ असं संजीव सूर्यवंशी म्हणाले. वैभवचा जन्म २३ मार्च २०११ चा आहे. आणि तो डावखुरा फलंदाज आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये तो ५ सामने खेळला आहे. आणि यात ४१ च्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येसह त्याच्या नावावर १०० धावा आहेत. (IPL Mega Auction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.