Irani Trophy 2024 : इराणी चषकात अजिंक्य रहाणेच मुंबईचा कर्णधार, १ ऑक्टोबरला लखनौला सामना

33
Irani Trophy 2024 : इराणी चषकात अजिंक्य रहाणेच मुंबईचा कर्णधार, १ ऑक्टोबरला लखनौला सामना
Irani Trophy 2024 : इराणी चषकात अजिंक्य रहाणेच मुंबईचा कर्णधार, १ ऑक्टोबरला लखनौला सामना
  • ऋजुता लुकतुके

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीने इराणी चषकासाठी (Irani Trophy 2024) मुंबईचा संघ जाहीर केला आहे. आणि रणजीत मुंबईला विजेतेपद मिळवून देणाऱ्या अजिंक्य रहाणेवरच (Ajinkya Rahane) कर्णधार म्हणून विश्वास दाखवला आहे. मागच्या हंगामात मुंबईने विजेतेपद मिळवलं असलं तरी अजिंक्यचा फॉर्म चिंताजनक होता. पण, त्याला आणखी एक संधी मिळाली आहे. तर भारतीय संघात परतण्यासाठी धडपडणारे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) यांनाही आपलं कसब आजमावण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) अलीकडेच इंग्लिश काऊंटी खेळून भारतात परतला आहे. इराणी चषकात (Irani Trophy 2024) आधीच्या हंगामातील रणजी विजेता संघ शेष भारत संघाशी दोन हात करतो. एरवी रणजी विजेत्या संघाला यजमानपद मिळतं. पण, मुंबईत पावसाची शक्यता लक्षात घेऊन यंदा हा सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. १ ते ४ ऑक्टोबर दरम्यान हा सामना खेळवला जाईल.

(हेही वाचा – HDFC Life चा मेट्रोपोलिस आणि कॉलहेल्थसह त्रिपक्षीय सहयोग)

भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरवर या वर्षी जूनमध्ये घोट्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर तो ३ महिने क्रिकेटपासून दूर राहिला. त्यानंतर सप्टेंबरमध्येच कर्नाटकच्या स्पर्धेत भाग घेतला. तो इराणी चषकासाठी उपलब्ध असेल, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनने सांगितले. मंगळवारपर्यंत इराणी चषकासाठी (Irani Trophy 2024) संपूर्ण संघ जाहीर केला जाऊ शकतो.

रणजी स्पर्धेतील मुंबई हा एक तगडा संध आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल ४१ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. पण, अलीकडे ६ वर्षं मुंबईला स्पर्धा जिंकता आली नव्हती. हा दुष्काळ गेल्यावर्षी अजिंक्य रहाणेच्या संघाने संपवला. संघाने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत विदर्भाचा पराभव करून ४२व्यांदा रणजी करंडक जिंकला.

२०२३ पासून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) भारतीय संघातून बाहेर आहे. अलीकडे संपलेल्या दुलिप करंडकात त्याची कामगिरी लौकिकाला साजेशी नव्हती. आता इराणी चषकात त्याला पुन्हा संधी मिळणार आहे. मुंबईने कर्णधाराची निवड जाहीर केली असली तरी इतर संघ निवडलेला नाही. आणि शेष भारत संघही अजून जाहीर व्हायचा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.