- ऋजुता लुकतुके
जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आंतरराष्ट्रीय स्तरावर विध्वंसक गोलंदाज म्हणून आपली क्षमता यापूर्वीच सिद्ध केली आहे. या घडीला तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. जगातील कुठल्याही खेळपट्टीवर बळी मिळवण्याची क्षमता, अचूकता आणि बळींची प्रभवी सरासरी यामुळे त्याच्या कामगिरीचा प्रभाव जाणवतो आणि आपल्या तिसऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहच्या गोलंदाजीची जादू ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींवरही पडली आहे.
ब्रिस्बेनमध्ये बुमराह (Jasprit Bumrah) कपिल देवला मागे टाकून भारताचा ऑस्ट्रेलियातील सगळ्यात यशस्वी गोलंदाज बनला आहे. इथे १३ कसोटी सामन्यांतच त्याने ५३ बळी आतापर्यंत मिळवले आहेत. या मालिकेतही त्याने आतापर्यंत २१ बळी मिळवले आहेत ते १०.९१ धावांच्या सरासरीने. त्याची सरासरी आणि अचूकता ही अतुलनीय आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानावर जितके कडवे प्रतिस्पर्धी असतात तितकेच ते मैदानाबाहेर कामगिरीचं कौतुकही करतात. आताही रिकी पाँटिंगने हातचं न राखता बुमराहचं कौतुक केलं आहे. ‘तो निर्विवादपणे या धडीचा जगातील सगळ्यात प्रभावी गोलंदाज आहे. टी-२० असो, एकदिवसीय की कसोटी क्रिकेट, बुमराहच सर्वोत्तम आहे. यात दुमत नाही,’ असं माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग म्हणाला.
(हेही वाचा – Nilkamal Passenger Boat Accident : नौदलाच्या स्पीड बोट वरील चालकावर गुन्हा दाखल)
तर या मालिकेत आतापर्यंत २ शतकं झळकावणाऱ्या ट्रेव्हिस हेडनेही बुमराहविषयी आदरच व्यक्त केला आहे. पाँटिंगच्या दोन पावलं पुढे जात हेड म्हणतो, ‘बुमराहचं (Jasprit Bumrah) नाव क्रिकेटच्या इतिहासात सर्वकालीन सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणून नोंदवलं जाईल. भारताचा सर्वोत्तम गोलंदाज तर तो आहेच. पण, क्रिकेटचा इतिहासही त्याची नोंद घेईल,’ असं हेड म्हणाला. बुमराहच्या गोलंदाजीच्या विचित्र शैलीची नेहमी चर्चा होते. तो खूप कमी रनअपमध्ये चांगला वेग निर्माण करतो. अहमदाबादमध्ये त्याचं बालपण गेलं आणि तिथे लहान जागेत सराव करताना त्याने ही शैली आत्मसात केली आहे.
पण, तिच्या जोरावर आज तो भल्या भल्यांना बुचकाळ्यात पाडतो आहे. स्वत: तेज गोलंदाज असलेला जोश हेझलवूडही बुमराहच्या (Jasprit Bumrah) गोलंदाजीने प्रभावित झाला आहे. ‘त्याची चेंडूची फेक वेगळी आहे. तो उशिरा चेंडू हातातून सोडतो आणि हा चेंडू करामत करू शकतो. यॉर्कर तर तो मनाला येईल तेव्हा टाकू शकतो. जर तुम्ही आधी कधी त्याला खेळला नसाल, तर पहिल्याच प्रयत्नांत त्याला खेळणं जवळ जवळ अशक्य आहे,’ असं हेझलवूड म्हणाला. अलीकडे टी-२० विश्वचषकातही अंतिम सामन्यात बुमराहच्या अचूक गोलंदाजीमुळे भारताने अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी दक्षिण आफ्रिकेला हरवलं होतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community