Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला अधून मधून विश्रांती घेण्याचा ग्लेन मॅकग्राचा प्रेमळ सल्ला

गोलंदाजीतील धार कायम ठेवण्यासाठी ग्लेन मॅग्राचे अनुभवाचे बोल

174
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला अधून मधून विश्रांती घेण्याचा ग्लेन मॅकग्राचा प्रेमळ सल्ला
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला अधून मधून विश्रांती घेण्याचा ग्लेन मॅकग्राचा प्रेमळ सल्ला
  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मुख्य तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) गेल्यावर्षी पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकला नव्हता. पण, मैदानावर पुनरागमन केल्यानंतर मात्र त्याला लागलीच लय सापडली. आणि तो अल्पावधीतच टी-२०, एकदिवसीय आणि कसोटीतही आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये पोहोचला. आताही आयपीएलचे पुढचे दोन महिने तो मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) गोलंदाजीची धुरा वाहण्यासाठी सज्ज आहे.

अशावेळी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज तेज गोलंदाज ग्लेन मॅग्राने त्याला सबुरीचा सल्ला दिला आहे. मॅकग्रा एमआरएफ पेस फाऊंडेशनमधील प्रशिक्षणार्थी तेज गोलंदाजांना मार्गदर्शन करतो. त्यासाठी तो भारतात आहे. बुमराहची गोलंदाजीची शैली चारचौघांसारखी नसल्यामुळे त्याच्या खांद्यावर अतिरिक्त जोर येतो. त्यामुळे बुमराहने सलग क्रिकेट खेळल्यानंतर विश्रांती घेण्याचा सल्ला त्याला मॅकग्राने दिला आहे. (Jasprit Bumrah)

‘बुमराहची शैली वेगळी आहे. आणि प्रत्येक चेंडूत तो जान ओकतो. त्यामुळे खांदे आणि एकूणच शरीरावर एवढा जोर येतो की, बुमराहसारख्या गोलंदाजाने एखादा हंगाम विश्रांती घेणं हे त्याच्या शरीरासाठी आवश्यक आहे. नाहीतर त्याची ताकद कमी होत जाईल. आणि मग दुखापतही डोकं वर काढू शकेल,’ असं मॅकग्राने बोलून दाखवलं. (Jasprit Bumrah)

(हेही वाचा – Rohit Hardik Hug : रोहित हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी सज्ज, सरावाच्या वेळी दोघांनी दिलं आलिंगन)

बुमराहचा गोलंदाजीचा रन-अप खूप छोटा आहे. असं असताना तो वेग कुठून पैदा करतो, या प्रश्नावर उत्तर देताना मॅकग्रा म्हणाला, ‘बुमराहचं कोपर अगदी सरळ रेषेत असतं. त्यातून एखाद्या मैलाचा वेग वाढतो. आणि मुख्य वेग त्याच्या शेवटच्या दोन उड्यांमध्ये तयार होतो. त्या दोन उड्या तो त्वेषाने मारतो.’ (Jasprit Bumrah)

नऊ वर्षांच्या कालावधीनंतर आयपीएल खेळणाऱ्या मिचेल स्टार्कचं त्याने कौतुक केलं. ‘मिचेलची शैली छोट्या फॉरमॅटसाठी उपयुक्त आहे. त्याने टी-२० जास्त खेळायला हवं. शिवाय आता टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यावेळी स्टार्कचा ऑस्ट्रेलियन संघाला उपयोग होईल,’ असं मॅकग्रा म्हणाला. कर्णधार म्हणून पॅट कमिन्सलाही त्याने कौतुकाची पावती दिली.

(हेही वाचा – Supreme Court : मोफत ‘भेटवस्तू’ देण्याच्या आश्वासनांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका)

तर खासकरून टी-२० प्रकारात फलंदाज गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत असल्याबद्दल त्याने विशेष भाष्य केलं. ‘बहुतेक सर्व फलंदाजांची शैली हल्ली आक्रमक असते. शिवाय गोलंदाजांना खेळण्यासाठी ते अभिनव पद्धतीचे फटके शोधून काढतात. आता गोलंदाजांनी आपलं कौशल्य दाखवून देण्याची वेळ आली आहे. त्यांनी हे आव्हान स्वीकारावं. आणि गोलंदाजीत प्रयोगशीलता दाखवावी,’ असं मॅकग्रा यावर बोलताना म्हणाला.

आयपीएलसाठी यंदा चेन्नई, बंगळुरू आणि मुंबई संघात चुरस असेल असंही मॅग्राने बोलून दाखवलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.