-
ऋजुता लुकतुके
मागचे दोन महिने भारताचा स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. आता आयपीएलमध्येही किमान पहिले दोन आठवडे तो खेळू शकणार नाही, असं दिसतंय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चौथ्या कसोटीदरम्यान बुमराला पाठदुखीचा त्रास सुरू झाला आणि तेव्हापासून तो खेळलेला नाही. बुमराहची ही जुनीच पाठदुखी आहे आणि एकदा शस्त्रक्रिया झालेली असताना पुन्हा या दुखण्याने डोकं वर काढलं आहे.
अशावेळी न्यूझीलंडचा माजी तेज गोलंदाज शेन बाँडने बुमराहच्या (Jasprit Bumrah) दुखापतीविषयी एक भीती व्यक्त केली आहे. ‘त्याच जागी पुन्हा दुखापत झाली तर बुमराची कारकीर्द संपू शकते. त्यामुळे दोन कसोटींच्यावर त्याला सलग खेळवू नये,’ असा सल्लाच बाँडने दिला आहे. आधुनिक युगात गोलंदाजीचा वेग सर्रास ताशी १४० किमींच्या वर जाऊ लागला तेव्हाच्या पिढीतील एक शिलेदार आहे शेन बाँड. त्याला स्वत:ला २९ व्या पाठदुखीवर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली होती. त्यानंतर पाठदुखीने त्याला वारंवार सतावलं. अखेर ३४ व्या वर्षी त्याला कसोटीतून निवृत्ती पत्करावी लागली आणि त्यानंतर काही महिन्यांत त्याने एकदिवसीय क्रिकेटलाही राम राम केला.
(हेही वाचा – Shubman Gill : शुभमन गिल ठरला फेब्रुवारीतील आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू)
‘बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच क्रिकेटमध्ये परतेल. त्याला लयही लगेच सापडेल. पण, आता त्याच्यावरील गोलंदाजीच्या भाराचं नियोजन करणं महत्त्वाचं असेल. भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम बघता तशी विश्रांतीची जागाच मला दिसत नाही. खेळाडूसाठी कठीण काळ असतो एखाद्या प्रकारातून दुसऱ्या प्रकारात स्थिरावण्याचा. आयपीएलच्या दीड महिन्यानंतर लगेच इंग्लंडचा कसोटी दौरा आहे. दोन्ही स्पर्धा प्रत्येकी दीड महिन्याच्या आहेत. त्यामुळे तिथे बुमराहची खरी कसोटी लागेल,’ असं मत बाँडने क्रिक – इन्फो या वेबसाईटशी बोलताना व्यक्त केलं आहे.
आणि म्हणूनच आयपीएल खेळल्यावर बुमराहला (Jasprit Bumrah) लगेचच पाचही कसोटींत खेळवू नये अशा मताचा बाँड आहे. ‘फक्त इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचाही प्रश्न नाहीए. पुढे टी-२० विश्वचषकाचा हंगाम आहे. त्याच्या पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक आहे आणि अशा महत्त्वाच्या स्पर्धा रांगेत उभ्या असताना बुमराहला कशी विश्रांती मिळेल याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. त्याला जपून वापरलं तर तो या सगळ्या स्पर्धा खेळू शकेल आणि भारतासाठी चांगली कामगिरीही करू शकेल,’ असं शेवटी बाँड म्हणाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराहवरच भारताच्या गोलंदाजीचा भार होता आणि पाच कसोटींत मिळून बुमराने तब्बल १५२ षटकं टाकली. यात एकट्या मेलबर्न कसोटीत त्याने ५२ षटकं टाकली. त्यामुळेच त्याला शेवटच्या सिडनी कसोटींत पाठदुखीचा त्रास सुरू झाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community