-
ऋजुता लुकतुके
वयाच्या ३५ व्या वर्षी आयसीसीचं अध्यक्षपद मिळवून जय शाह (Jay Shah) यांनी सगळ्यात लहान आयसीसी अध्यक्ष होण्याचा मान मिळवला आहे. आता १ डिसेंबर २०२४ पासून ते अध्यक्षपदाची आपली कारकीर्द सुरू करतील. अमेरिकेत टी-२० विश्वचषकाचं आयोजन आणि आगामी २०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश अशा सकारात्मक परिस्थितीत जय शाह कारभार हातात घेणार असले तरी त्यामुळे त्यांच्यासमोरची आव्हानंही वाढणार आहेत. कारण, क्रिकेटचा पुढील विस्तार निर्धोक करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. सध्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया सारख्या मोठ्या मंडळांनी पहिल्या २ वर्षांच्या मुदतीसाठी शाह यांना पाठिंबा दिला आहे. पण, ऑलिम्पिकपर्यंत सर्वोच्चपदी राहायचं असेल तर जय शाह यांना सगळ्या क्रिकेट मंडळांचा पाठिंबा जिंकत रहावं लागेल. समोरची आव्हानं काही कमी नाहीत. पण, जय शाह यांना १५ क्रिकेट मंडळांच्या पाठिंब्यावर तो प्रवास करता येईल. पाहूया त्यांच्यासमोरची ५ महत्त्वाची आव्हानं.
(हेही वाचा- Jammu and Kashmir मध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर; ३ दहशतवादी ठार)
१. चॅम्पियन्स करंडक
हा तिढा आहे पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचा. स्पर्धा पाकिस्तानमध्ये असल्यामुळे भारतीय संघ पाकचा दौरा करायला तयार होईल का, हा मुख्य प्रश्न आहे. आयसीसीमध्ये या मुद्यावर चर्चा सुरूच आहे. पण, इतके दिवस जय शाह भारताची बाजू मांडत होते. आता त्यांना दोन्ही पक्षांचा साकल्याने विचार करून तोडगा काढावा लागणार आहे. एकतर भारताचे सामने त्रयस्थ ठिकाणी भरवायला पाकला राजी करणं किंवा भारताला पाकला जायला तयार करणं हे अवघड काम जय शाह यांना करायचं आहे. (Jay Shah)
२. कसोटी क्रिकेटच मूलभूत क्रिकेट
ऑलिम्पिकमुळे क्रिकेटचा विस्तार होणार आहे. पण, यात खेळलं जाईल ते टी-२० क्रिकेट. आणि हाणामारीच्या या क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट मागे पडतंय ही सार्वत्रिक भावना आहे. जय शाह यांनी क्रिकेटचे सगळे प्रकार जिवंत राहतील आणि एकत्र नांदतील अशी हमी तर दिली आहे. पण, ते घडवून आणणं सोपं नाही. कारण, टी-२० मध्ये पैसा आहे. आणि कसोटीत क्रिकेटचा जीव आहे. आणि पैशासाठी खेळाडू कसोटी सोडून टी-२० लीगना प्राधान्य देत असताना ही कसोटी जगवत ठेवणं हे कठीण आहे. जय शाह यांच्याकडून अपेक्षा आहे ती कसोटीसाठी ठोस रणनीती आखण्याची. (Jay Shah)
(हेही वाचा- Deep Fake Video of Virat Kohli : विराट, शुभमनचा डीपफेक व्हीडिओ व्हायरल )
३. क्रिकेटचा विस्तार
टी-२० क्रिकेटला आता आशिया, युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडापाठोपाठ अमेरिकेतही मान्यता मिळताना दिसतेय. प्रत्येक खंडातील किमान ४ देश एखादा खेळ खेळत असतील तर त्या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करता येतो. आणि अमेरिकेत क्रिकेट शिरकाव करत असताना जय शाह यांना आयसीसी अध्यक्ष म्हणून या विस्ताराकडेच लक्ष द्यायचं आहे. क्रिकेटला खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याबरोबरच या देशात चांगल्या सुविधा उभ्या रहाव्यात, याकडेही आयसीसीला लक्ष द्यावं लागेल. (Jay Shah)
४. क्रिकेटमध्ये समानता
ही समानता स्त्री-पुरुष आणि आयसीसी सदस्य व असोसिएट देश अशी दोघांमध्ये आहे. महिला क्रिकेट आता आयसीसीच्या छत्राखाली आहे. त्यामुळे महिला व पुरुषांना सामने तसंच दौऱ्यांसाठी समान संधी मिळणं, त्यासाठी एकसमान मोबदला मिळणं देशांतर्गत क्रिकेटचाही विकास होणं, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट क्रिकेटचा प्रसार करताना एसोसिएट सदस्य देशांनाही क्रिकेटच्या समान सुविधा, समान मोबदला, तिथली लीग प्रणाली यावर लक्ष ठेवणं ही आयसीसीचीच जबाबदारी असणार आहे. (Jay Shah)
(हेही वाचा- ICC Test Ranking : आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही भारतीय क्रिकेटपटूंची चलती, विराटची आगेकूच)
५. सदस्य क्रिकेट मंडळांचा पाठिंबा मिळवणं
आता जय शाह यांची निवड बिनविरोध झाली आहे. खासकरून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड ही क्रिकेट मंडळं शाह यांच्या बाजूने उभी राहिली. जय शाह यांना पुन्हा निवडून यायचं असेल तर या मंडळांना एकत्र घेऊन पुढे चाल करणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, लॉस एंजलीस ऑलिम्पिकमधील क्रिकेटची स्पर्धा जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, असं जर त्यांना वाटत असेल तर मंडळांचा पाठिंबा आवश्यक आहे. (Jay Shah)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community