आयपीएल स्पर्धा भारतीयांसाठी सणापेक्षा कमी नसते. आयपीएलच्या १६ व्या हंगामाची यंदा ३१ मार्चपासून दणक्यात सुरूवात झाली. प्रत्येक वर्षी या स्पर्धेत वेगळेपणा आणला जातो आणि नवे नियम लागू केले जातात. यावर्षी इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू करण्यात आला असून या अंतर्गत दोन्ही संघ सामन्याच्या कोणत्याही क्षणी बदली खेळाडू आणू शकतात. समजा, एखादा संघ बॅटिंग करत असेल तर तो कोणत्याही क्षणी एका बॉलरला कमी करून बॅटरला संघात घेऊ शकतो.
आयपीएलचे सामने मैदानावर येऊन बघणाऱ्यांपेक्षा टीव्ही, मोबाईलवर बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या जास्त असते. यातून मोठ्या प्रमाणात पैसे सामना प्रक्षेपित करणाऱ्या कंपन्यांना मिळतात. आयपीएल मोबाईलवर बघणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हॉटस्टासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मने आयपीएल मोबाईलवर सबस्क्रिप्शन घेऊन दाखवायला सुरूवात केली आणि आता २०२३ मध्ये जिओने आयपीएल फुकटात दाखवायला सुरूवात केली आहे.
बीसीसीआयचे धोरण
२०२३ ते २०२७ पर्यंत बीसीसीआयने आयपीएल प्रक्षेपणाच्या हक्कासाठी पॅकेजेस केले आहेत. A,B,C,D असे या पॅकेजेसचे स्वरूप आहे. टिव्हीचे हक्क स्टारला तर डिजिटलमध्ये व्हायकॉम १८ ला हक्क मिळाले असून यातून बीसीसीआयला ४८ हजार ३९०.५ कोटी मिळाले.
जिओचा फायदा काय ?
डिजिटल हक्क मिळवण्यासाठी वायकॉमने २३ हजार ७५८ कोटी दिले. वायकॉमचे आधी दोन ओटीटी प्लॅटफॉर्म होते. वूट आणि जिओ सिनेमा. २०१६ साली जिओ सिनेमा लॉंच झाले आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये वायकॉमने वूट आणि जिओ सिनेमाचे विलिनीकरण करून जिओ सिनेमा या एकाच नावाने प्लॅटफॉर्म सुरू केले. २०२२ चा फिफा वर्ल्ड कप आणि डब्लूपीएल या स्पर्धा सुद्धा यावर मोफत दाखवण्यात आल्या.
पण आता आयपीएलच्या पहिल्या मॅच दिवशी २.५ कोटी लोकांनी या अॅपवर मॅच पाहिली. एवढ्या लोकांपर्यंत एकाचवेळी पोहोचणे जिओला आयपीएलमुळे शक्य झाले. याशिवाय अॅप घेतल्यावर आपण विविध अटी आणि नियमांवर क्लिक करतो त्यामुळे त्यांना युर्झसचा डेटाबेस सुद्धा मिळतो. याचप्रकारे त्यांनी आधी जिओ सिम कार्ड देताना केले होते. जिओची आधी मोफत देऊन नंतर पैसे घ्यायचे ही रणनिती फार पूर्वीपासूनची आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी जर आयपीएल बघण्यासाठी पैसे आकारले तरी लोक पैसे भरून सामने बघतील असे वातावरण जिओने तयार केले आहे.
Join Our WhatsApp Community