ऋजुता लुकतुके
यंदाच्या वर्षी जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या ज्योती येराजीने आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत कांस्य पदक जिंकलं आहे. हे करताना तिने नवीन राष्ट्रीय विक्रम तर मोडला. पण, पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचं लक्ष्य मात्र थोडक्यात हुकलं. भारताची सर्वोत्तम युवा ॲथलीट ज्योती येराजीने (Jyothi Yarajji) चीनच्या चेंगडू (Chengdu, China) शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पधेत (World University Games 2023) १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत आणखी एकदा स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला. आणि १२.७८ सेकंदांच्या विद्युत वेगासह कांस्य पदकही जिंकलं.
पण, पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता निकषात मात्र ती ०.१ सेकंदांनी कमी पडली. असं असलं तरी ज्योतीचं गेल्या दोन वर्षातील सातत्य लक्षवेधी आहे. आणि त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. एकूणच अडथळ्यांच्या शर्यतीची अंतिम फेरी चुरशीची ठरली. प्रथम क्रमांकाच्या तीनही ॲथलीटच्या वेळेवरून याची कल्पना येईल. सुवर्ण विजेत्या स्लोवाकियाच्या व्हिक्टोरिया फॉर्स्टरची (Victoria Forster) वेळ होती १२.७२ सेकंद. रौप्य विजेत्या चीनच्या यानी वूची (Yanni Wu) वेळ होती १२.७६ सेकंद. म्हणजेच ज्योतीचं सुवर्ण फक्त ०.०६ सेकंदांनी हुकलं. पण, काहीच महिन्यांपूर्वी बंगळुरूत झालेल्या राष्ट्रीय खेळांत ज्योतीने १२.८६ सेकंदांची वेळ नोंदवली होती. त्या तुलनेत आताची तिची कामगिरी खूप सुधारली आहे. विशेष म्हणजे २०२३ मध्ये तिने ७ वेळा १३ सेकंदांपेक्षा कमी वेळ नोंदवली आहे. नुकतीच तिने आशियाई चॅम्पियनशिपही जिंकली होती.
Jyothi Yarraji set Indian record in the women 100m hurdles with a performance of 12.78s in FISU World University Games at Chengdu. Jyothi bagged bronze medal in high voltage final. pic.twitter.com/GQN7RYZsbB
— Rahul PAWAR ( राहुल पवार ) (@rahuldpawar) August 4, 2023
(हेही वाचा – भारतीय महिला तिरंदाजी संघाची ऐतिहासिक कामगिरी, ‘या’ कम्पाऊंड प्रकारात पटकावले सुवर्ण पदक)
आता ज्योतीने लक्ष्य ठेवलं आहे ते १२.७० पेक्षा कमी वेळ देण्याचं.
ज्योतीची मैत्रीण अमलन बोर्गोहेननं २०० मीटर शर्यतीत २०.५५ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्य जिंकलं. दोघी रिलायन्स फाऊंडेशनच्या बंगळुरू इथल्या केंद्रात प्रशिक्षक जेम्स हिलिअर (James Hillier) यांच्याकडे प्रशिक्षण घेतात. जेम्स यांनी ज्योतीचं विशेष कौतुक केलं आहे. “ज्योतीची आणखी एक पदत विजेती कामगिरी पाहून मी खुश झालो आहे. विशेष म्हणजे ती स्वत:चेच राष्ट्रीय विक्रम मोडत आहे, ही समाधानाची बाब आहे. वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नेहमीच पुढच्या यशासाठी प्रेरणा देते. त्यासाठी ज्योतीचं विशेष अभिनंदन,” असं जेम्स म्हणाले.
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ज्योतीने सर्वप्रथम १३ सेकंदांपेक्षा कमी वेळेत १०० मीटर अडथळ्यांची शर्यत पूर्ण केली. तोपर्यंत भारतीय महिलांसाठी १३ पेक्षा कमी वेळ देणं अशक्यप्रास मानलं जात होतं. पण, ज्योती तेवढ्यावर न थांबता सातत्याने आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेत सुधारणा करत आहे. त्यामुळे पुढील वर्षी ऑलिम्पिक स्पर्धेतही तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. शर्यंत चांगली झाली तर विक्रम होत राहतील. पण, माझा भर तांत्रिक चुका टाळण्यावर असतो. धावताना अडथळ्यांना स्पर्श होऊन फाऊल होऊ नये यासाठी मी जास्त काळजी घेते, असं ज्योती नवी दिल्लीत बोलताना म्हणाली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community