खेलरत्न पुरस्काराची ओळख आता मेजर ध्यानचंद यांच्या नावाने!

169

भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली आहे. याआधी या पुरस्काराचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने ओळखला जात होता. पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतातील अनेक नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने ओळखला जावा, असे म्हटले होते. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावाने ओळखला जाईल, असे म्हटले.

मेजर ध्यानचंद यांचे भारतीय हॉकीतील योगदान

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाते. मेजर ध्यानचंद यांचे भारतीय हॉकीमध्ये महत्वाचे योगदान राहिले आहे. त्यांनी त्यांच्या अखेरच्या ऑलम्पिकमध्ये १३ गोल केले होते. त्यांनी बर्लिन येथे १९३६ मध्ये अखेरचे ऑलम्पिक खेळले होते. अमस्टर्डम, लॉस एंजेलिस आणि बर्लिन ऑल्मपिक मिळून ध्यानचंद यांनी ३९ गोल केले होते. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. २९ ऑगस्टला त्यांची जयंती असते. खेल रत्न पुरस्कारांची सुरुवात १९९१-९२ मध्ये करण्यात आली होती. ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलम्पिकमध्ये १९२८ अमस्टर्डम, १९३२ लॉस एंजेलिस आणि १९३६ बर्लिनमध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

(हेही वाचा : फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने का सोडला बार्सिलोना क्लब? किती होती त्याची कमाई?)

भारतरत्न देण्याची मागणी

भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, अद्याप त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले नाही. क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याला देण्यात आलेला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.