- ऋजुता लुकतुके
भारतीय पुरुष आणि महिला संघांनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. नेपाळला अंतिम सामन्यात पराभूत करत भारतीय संघांनी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. दोन्ही अंतिम सामने चुरशीचे झाले. आणि प्रेक्षकांच्या मोठा पाठिंबा भारताच्या संघांना लाभला हे अंतिम फेरीचं वैशिष्ट्य सांगता येईल. प्रेक्षकांनी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी केली. तर भारतीय संघांनी स्पर्धेच्या सुरुवातीपासून आपला दबदबा कायम ठेवत प्रेक्षकांना निराश केलं नाही. महिलांच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळवर ७८-४० असा ३८ गुणांनी विजय साकारला. पुरुष अंतिम सामन्यात भारताने नेपाळला ५४-३६ असा १८ गुणांनी पराभूत केले. अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघांने आपल्या चपळ खेळाने प्रेक्षकांना थक्क केले. महिला संघानेही उत्कृष्ट संघभावना आणि अचूक रणनीतीच्या जोरावर नेपाळला हरवून सुवर्ण कामगिरी केली.
भारतीय संघाचा विजय ही त्यांच्या अथक मेहनतीचे फलित होते. जलद चपळाई, अचूकता आणि जिद्दीने मैदानावर भारतीय खेळाडूंनी एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि कर्णधारांच्या नेतृत्वाने संघाने प्रत्येक क्षणाला सामर्थ्यपूर्ण प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्या निमित्ताने खो-खो या पारंपरिक भारतीय खेळाने जागतिक पातळीवर आपले अस्तित्व दाखवले आहे. हा विजय केवळ संघाचा नव्हे, तर भारतीय क्रीडा संस्कृतीचा मोठा विजय आहे. (Kho-Kho World Cup)
(हेही वाचा – Stars in Ranji Trophy : बीसीसीआयच्या दणक्यानंतर रोहित, रिषभ सह हे स्टार खेळाडू खेळणार रणजी सामना )
महिलांच्या अंतिम सामन्यात पहिल्या टर्नमध्ये भारतीय संघाने आक्रमण करताना नेपाळची पहिली तुकडी ५० सेकंदात, दुसरी तुकडी १.४८ मि. तर तिसरी तुकडी १.२० मि. बाद केली व चौथी तुकडी १ मि. पाचवी तुकडी ४५ सेकंदात तर उरलेले दोन खेळाडू ३४ सेकंदाच्या आत बाद करत भारताच्या खेळाडूंनी ३४ गुण मिळवले या वेळी कर्णधार प्रियांका इंगळे, रेश्मा राठोड यांनी चमकदार खेळी केली.
दुसऱ्या टर्नमध्ये नेपाळच्या पहाडी मुलींनी कमालीचा खेळ करत भारताच्या ड्रीम रन गुणसंख्येला वेसन घातले. नेपाळने भारताची पहिली तुकडी तीन मि. नंतर बाद केल्याने भारताला एक ड्रीम रन चैतरा बी ने मिळवून दिला. दुसरी तुकडी १.३९ मि. बाद करण्यात नेपाळला यश मिळाले. तर तिसरी तुकडी ५३ सेकंदाच्या आत तंबूत परतल्याने खरतर भारताला हा मोठा धक्का होता. त्यानंतर नेपाळने आपल्या आक्रमणाची धार वाढवून १.१३ मि. चौथ्या तुकडीला बाद केले. तर त्यानंतर पुढची तुकडी नाबाद खेळल्याने भारताने मध्यंतराला ३५-२४ अशी ११ गुणांची आघाडी घेतली होती. (Kho-Kho World Cup)
(हेही वाचा – Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलिस जबाबदार; मुंबई उच्च न्यायालयाचा अहवाल सादर)
तिसऱ्या टर्नमध्ये भारताने आक्रमणात नेपाळची पहिली तुकडी १.४२ मि. बाद करून जोरदार प्रतिउत्तर दिले तर दुसरी तुकडी ३३ सेकंदात बाद झाली. तिसऱ्या तुकडीला १.०७ मि. बाद करत भारताने मोठ्या गुणसंख्येकडे वाटचाल सुरु केली. चौथी तुकडी ५० सेकंदात कापून काढली. पाचवी तुकडी ५५ सेकंदात बाद करून नेपाळला जोरदार झटका दिला. तर सहावी तुकडी ३४ सेकंदात बाद करून नेपाळची आणखी एक झटका दिला. सातव्या तुकडीतील एक खेळाडू बाद करण्यात भारताला यश मिळाल्याने भारताने ७३-२४ अशी गुणांची नोंद केली. या वेळी नेपाळच्या दीप बी के ने चांगला खेळ केला.
चौथ्या टर्न मध्ये नेपाळने आक्रमण केले पण ते आक्रमण परतवून लावताने भारताच्या पहिल्या तुकडीने ५.१४ मि. वेळ देत नेपाळला सामन्यात पुन्हा परतण्याची संधीच न देण्याची किमिया साधली व हा सामना भारताने ७८-४० असा ३८ गुणांनी जिंकला. भारताने साखळी फेरीत दक्षिण कोरिया, इराण आणि मलेशियावर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर बांगलादेशवर उपांत्यपूर्व फेरीत आणि दक्षिण आफ्रिकेवर उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. (Kho-Kho World Cup)
(हेही वाचा – पालकमंत्री वाटपात BJP चा मास्टरस्ट्रोक; पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादी हद्दपार, मित्रपक्षांना दिलासा)
सामन्याचे पुरस्कार :
• सर्वोत्तम आक्रमक : अंशू कुमारी (भारतीय संघ)
• सर्वोत्तम संरक्षक : मनमती धानी (नेपाळ संघ)
• सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू : चैत्रा बी (भारतीय संघ)
दुसरीकडे पुरुषांच्या संघानेही आक्रमक खेळ करत नेपाळला डोकं वर काढण्याचीही संधी दिली नाही. पहिल्या टर्न मध्ये भारताने तब्बल चार तुकड्या बाद करून नेपाळला जोरदार धक्का दिला व या आक्रमणाच्या टर्नमध्ये भारताने २६-० असे गुण वसूल केले.
दुसऱ्या टर्न मध्ये नेपाळच्या आक्रमणात भारताची पहिली तुकडी २.४४ मि. संरक्षण करू शकली तर दुसरी तुकडी १.५९ मिनिटात बाद झाली. तर तिसऱ्या तुकडीतील खेळाडूंनी २.०२ मि. वेळ देत बाद झाली तर चौथी तुकडी नाबाद राहिली त्यामुळे मध्यंतराला २६-१८ असा गुणफलक दिसत होता. (Kho-Kho World Cup)
(हेही वाचा – D Gukesh : टाटा स्टील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशची यशस्वी सलामी)
तिसऱ्या टर्न मध्ये आक्रमण करताना भारताने नेपाळची पहिली तुकडी १.४९ मि. बाद केली तर दुसरी तुकडी १.१० मि. तंबूत परतली. तर तिसरी तुकडी अवघ्या ४५ सेकंदात बाद केली. चौथ्या तुकडीला १.०७ मि. बाद केले. पाचव्या तुकडीतील दोन खेळाडू बाद झाले. यावेळी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा गुणफलक ५४-१८ असे गुण दर्शवत होता.
चौथ्या व शेवटच्या टर्न मध्ये नेपाळने आक्रमणाला सुरवात केली व भारताची पहिली तुकडी दोन मिनिटात परतवण्यात नेपाळने यश मिळवले. तर दुसरी तुकडी २.१६ मि. बाद झाली तर तिसरी तुकडी २.०१ मि. बाद झाली तर चौथी तुकडी नाबाद राहिली व भारताने हा सामना ५४-३६ असा १८ गुणांनी जिंकत विश्वचषकाला कवटाळले.
भारतीय संघाचा विजय प्रवास :
भारताने गट फेरीत ब्राझील, पेरू, आणि भूतान यांच्यावर प्रभावी विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशला आणि उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
सामन्याचे पुरस्कार :
• सर्वोत्तम आक्रमक : सुयश गरगटे (भारत)
• सर्वोत्तम संरक्षक : रोहित बर्मा (नेपाळ)
• सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू : मेहूल (भारत)
विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलं. महिला संघाचं नेतृत्व प्रियंका इंगळे तर पुरुषांच्या संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर होता. (Kho-Kho World Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community