Gukesh D : भारताचा अव्वल बुद्धिबळपटू गुकेश डी बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

विश्वनाथन आनंद गुकेश डीचा आदर्श

582
Gukesh D : भारताचा अव्वल बुद्धिबळपटू गुकेश डी बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
Gukesh D : भारताचा अव्वल बुद्धिबळपटू गुकेश डी बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

ऋजुता लुकतुके

विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand)  हा त्याचा आदर्श! त्याचा खेळ पाहातच तो लहानाचा मोठा झाला. पण, आज सतराव्या वर्षीच त्याने आनंदला बुद्धिबळात मागे टाकलं आहे. पाहूया गुकेशची आतापर्यंतची वाटचाल.

भारताचा युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर डी गुकेशनं (Gukesh D) विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मिस्त्रादिन इस्कानदरोवला (Mistradin Iscandov) हरवून इतिहास रचला आहे. सतराव्या वर्षीच तो विश्वनाथन आनंदला (Viswanathan Anand) मागे टाकून भारताचा अग्रमानांकीत बुद्धिबळपटू ठरला आहे. महत्त्वाचं म्हणजे, तब्बल ३६ वर्षांनंतर आनंदला या स्थानावरून पायउतार व्हावं लागलं. गुकेश आता जागतिक क्रमवारीतही (FIDE Ranking) पहिल्या दहात पोहोचला आहे.

फिडेच्या जागतिक क्रमवारीत गुकेश आता नवव्या स्थानावर असेल. तर विश्वनाथन आनंदची एक स्थान खाली म्हणजे दहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. खरंतर गुकेशनं विश्वनाथन आनंदचा सहभाग असलेल्या वेस्टब्रिज आनंद चेस अकॅडमीतच प्रशिक्षण घेतलं आहे. आणि तिथे थेट आनंदच्या मार्गदर्शनाखाली खेळाचे धडे गिरवले आहेत. म्हणूनच तो आनंदला आपला आदर्श मानतो. त्यामुळे गुकेशची ताजी क्रमवारी ही चेल्याने गुरूला दिलेली मानवंदनाच ठरेल.

आनंदनेही आपल्या या चेल्याला ट्विटरवरून शुभेच्छा देताना मुक्तकंठाने गुकेशची स्तुती केली आहे. आनंद म्हणतो, ‘’एकेकाळी भारताचा फक्त एक ग्रँडमास्टर होता. एकच जगज्जेता होता. आणि आज पहिल्या दहांत भारताचे दोन खेळाडू विराजमान आहेत. माझ्यासाठी हा खूप मोठा अभिनंदनाचा क्षण आहे. देशातल्या सर्व तरुण बुद्धिबळपटूंचं आणि त्यातही डी गुकेशचं खूप सारं अभिनंदन !’’

गुकेशनेही लगेचच आपल्या गुरूचे आभार मानले आहेत.

(हेही वाचा – नितीन देसाई आत्महत्या प्रकरण; बॉलिवूड कलाकारासह एडलवाईस कंपनी अधिकाऱ्यावर होणार गुन्हा दाखल)

या लेखात गुकेशविषयी आणखी काही माहिती जाणून घेऊया…

दोम्माराजू गुकेशचा जन्म आनंदचंच शहर चेन्नईत झाला आहे. त्याचे वडील नाक, कान आणि घसा तज्ज आहेत. तर आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. चेन्नईतच ७ मे २००६ मध्ये गुकेशचा जन्म झाला. वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळाशी त्याची ओळख झाली.

गुकेशची या खेळातली प्रगती आधीपासूनच विलक्षण आहे. त्याचे शाळेतले मार्गदर्शक एम भास्कर यांच्याकडे त्याने प्राथमिक धडे गिरवले तेव्हाच पहिल्या सहा महिन्यात त्याने फिडे मानांकनापर्यंत मजल मारली होती. पुढे विजयानंद यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. सात वर्षांच्या या मुलाने तेव्हा नऊ वर्षांच्या इतर मुलांना हरवलं होतं.

2018 पर्यंत या मुलाने पाच आशियाई स्तरावरील विजेतेपदं आपल्या नावावर केली होती. आणि त्याच्या जोरावर अकराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याचा बहुमानही त्याने पटकावला. तेव्हा गुकेश होता ११ वर्षं ९ महिने आणि ९ दिवसांचा. सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याचा विक्रम सतरा दिवसांनी हुकला. सध्या तो जगातला तिसरा सर्वात लहान ग्रँडमास्टर आहे.

मधली काही वर्षं कोरोनाची होती. पण, त्यानंतर स्पर्धा सुरळीत सुरू झाल्यावर गुकेशच्या कारकीर्दीत पुढचा महत्त्वाचा टप्पा २०२२ मध्ये आला. पाचवेळा जगज्जेतेपद पटकावलेल्या मॅग्नस कार्लसनला त्याने हरवलं. आणि ही कामगिरी करणारा तो सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता. त्याचं वय होतं सतरा वर्षं आणि काही दिवस. तो भारताचा साठावा ग्रँडमास्टर आहे. आणि २०२२ पासून त्याच्या कामगिरीचा आलेख सतत चढता राहिला आहे. सध्या तो बुद्धिबळ विश्वचषकात भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.