Pragnananda vs Carlsen : प्रज्ञानंदला हरवून मॅग्नस कार्लसनने जिंकला बुद्धिबळ विश्वचषक

टायब्रेकरमध्ये कमी वेळेत चाली रचण्यात आर प्रज्ञानंद पडला कमी

197
Pragnananda vs Carlsen : प्रज्ञानंदला हरवून मॅग्नस कार्लसनने जिंकला बुद्धिबळ विश्वचषक
Pragnananda vs Carlsen : प्रज्ञानंदला हरवून मॅग्नस कार्लसनने जिंकला बुद्धिबळ विश्वचषक
  • ऋजुता लुकतुके

प्रज्ञानंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यातील टायब्रेकर लढतीत कार्लसन सरस ठरला. आणि एक सामना जिंकत तर दुसरा बरोबरीत सोडवत कार्लसनने १.५ – .०५ अशी बाजी मारली. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत १८ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनला जोरदार लढत दिली खरी. पण, अखेर टायब्रेकरमध्ये कमी वेळेत चाली रचण्यात तो कमी पडला. आणि इथं त्याचा ०.५ – १.५ असा पराभव झाला. पण, उपविजेता ठरलेल्या प्रज्ञानंदचं सगळीकडे कौतुक होत आहे.

क्‍लासिकल बुद्धिबळाचे दोन सामने बरोबरीत सुटल्यामुळे या स्पर्धेचा निकाल वेगवान बुद्धिबळाचे दोन सामने (Rapid Chess) ठरवणार होते. यात दोन्ही खेळाडूंना चाली रचण्यासाठी दहा मिनिटं मिळतात. आणि प्रत्येक चाल रचल्यावर त्यात एक एक मिनिट अतिरिक्त मिळतं. पहिल्या टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंद पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळत होता. आणि त्याने सुरुवातीच्या खेळात पकडही मिळवली. पण, त्यानंतर त्याच्याकडून चुका झाल्या. आणि दहाव्या चालीनंतर मॅग्नस कार्लसनने खेळात पुन्हा एकदा बरोबरी मिळवली. पण, या सगळ्यात प्रज्ञानंदचा वेळ गेला. आणि शेवटच्या टप्प्यात कार्लसनकडे जेव्हा तीन मिनिटांचा वेळ बाकी होता, तेव्हा प्रज्ञानंदकडे एक मिनिटही नव्हतं. वेळेच्या दडपणाखाली अर्थातच प्रज्ञानंदचा खेळ घसरला. आणि पहिल्या सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला.

त्यानंतर दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर दुसरा सामना सुरू झाला तेव्हा कार्लसनकडे आधीच एका गुणाची आघाडी होती. त्यात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याचा फायदाही होता. त्यामुळे त्याने बचावात्मक आणि सावध पवित्रा घेत दुसरा सामना फक्त बरोबरीत रोखण्याची रणनिती आखली. प्रज्ञानंदलाही बरोबरी मान्य करावी लागली. टायब्रेकरच्या दुसऱ्या सामन्यातही कार्लसनने प्रभुत्व गाजवलं.

(हेही वाचा – The 3 Big Changes : भारतीय दंड संहिता (आयपीसी), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) आणि पुरावा कायदा वर चर्चा)

अंतिम सामन्यात पराभव झाला असला तरी प्रज्ञानंदच्या खेळाचं बुद्धिबळ जगतात कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशननेही (फिडे) प्रज्ञानंदचा गौरव केला आहे. शिवाय विश्वविजेत्याचा आव्हानवीर ठरवणारी कँडिडेट कप स्पर्धाही बुद्धिबळ जगतात मानाची समजली जाते. या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवणारा प्रज्ञानंद हा विश्वनाथन आनंद नंतरचा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.

अंतिम फेरीत पोहोचताना प्रज्ञानंदने द्वितीय मानांकीत हिकारू नाकामुरा आणि तृतीय मानांकीत फाबियानो कॅरुना यांचा पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत कॅरुना तिसऱ्या क्रमांकावर राहिला. ‘विश्वचषक स्पर्धेत विशेष चमक दाखवणाऱ्या १८ वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंदचं हार्दिक अभिनंदन!’ असं फिडेनं आपल्या शुभेच्छापत्रात म्हटलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.