महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमधील पदाचा गैरवापर करून लाटले क्रीडा गुण

राज्यातील क्रीडा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

247
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमधील पदाचा गैरवापर करून लाटले क्रीडा गुण

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमधील पदाचा गैरवापर करून एका संघटनेच्या अध्यक्षाने क्रीडा गुण लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्याच्या क्रीडा विभागाकडून याकडे पुरते दुर्लक्ष केले जात असून, अशा प्रकारांमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती क्रीडा प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

क्रीडा गुण मिळवण्यासाठी संबंधित क्रीडा संघटनेला भारतीय ऑलम्पिक असोसिएशन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता असावी लागते. मात्र, ‘इंडिया तायक्वांदो’ या संघटनेला भारतीय ऑलम्पिक असोसिएशनची मान्यता नसताना त्यांनी क्रीडा गुण सवलत मिळवली आहे. हास्यास्पद बाब म्हणजे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची मान्यता नसलेल्या या संस्थेला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने मात्र मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील क्रीडा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

(हेही वाचा – मिशन २०२४ : ४५० जागांवर विरोधकांचा ‘वन इज टू वन’ फॉर्म्युला)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इंडिया तायक्वांदो’ या संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस आहेत. त्यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून ‘इंडिया तायक्वांदो’ला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची मान्यता नसतानाही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता मिळवून दिली. त्यामुळेच या संघटनेंतर्गत विशेष प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना क्रीडा सवलत देण्यात आली. मात्र, हे नियमांच्या विरुद्ध असून, असे गैरप्रकार थांबले नाहीत, तर महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचे भवितव्य धोक्यात येईल, अशी चिंता क्रीडा क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

‘ती’ व्यक्ती अद्यापही उपाध्यक्षपदी

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमधील पदाचा दुरुपयोग करण्याची ही पहिली वेळ नव्हे. एका वर्षापूर्वी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने गैरकारभारासाठी निलंबित केलेले जय गवळी अजूनही महाराष्ट्र बॉक्सिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी आहेत. क्रीडा मंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन हे गैरप्रकार थांबवावेत, अशी मागणी क्रीडाप्रेमींकडून केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.