National Games Kusti Team: महाराष्ट्र ऑलिम्पिक कुस्तीला सापत्न वागणूक देतेय?

162
National Games Kusti Team: महाराष्ट्र ऑलिम्पिक कुस्तीला सापत्न वागणूक देतेय?
National Games Kusti Team: महाराष्ट्र ऑलिम्पिक कुस्तीला सापत्न वागणूक देतेय?
ऋजुता लुकतुके

गोवा इथं सुरू झालेल्या राष्ट्रीय खेळांसाठी महाराष्ट्राच्या कुस्ती संघाची निवड तर झाली. पण, खेळाडूंना वेळेवर किट देणं किंवा त्यांची गोव्याला पोहोचण्याची सोय करणं या बाबतीत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेनं अक्षम्य हलगर्जी दाखवल्याचा आरोप कुस्ती परिषदेचे पैलवान संदीप भोंडवे यांनी केला आहे. (National Games Kusti Team)

३७ व्या राष्ट्रीय खेळांना नुकतीच सुरुवात झाली आहे. आणि या स्पर्धेत सहभागासाठी महाराष्ट्राचा कुस्ती संघ आता गोव्यात दाखलही झालाय. पण, तोपर्यंत कुस्तीपटू आणि काही पदाधिकाऱ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागल्याचं पुढे आलं आहे. खेळाडूंना वेळेवर किट देण्यात आली नाहीत, नेमकं कधी गोव्याला जायचंय याची माहिती आदल्या दिवशीपर्यंत खेळाडूंना देण्यात आली नाही. आणि दोन पदाधिकाऱ्यांची तर ऐन वेळी तिकीट रद्द करण्यात आली असा आरोप पुणे कुस्ती परिषदेचे अध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे यांनी केला आहे. संदीप भोंडवे हे भारतीय जनता पार्टीच्या क्रीडा आघाडीचे संयोजकही आहेत. आणि त्यांनी क्रीडा आधाडीकडून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांना इशारा दिला आहे. शिरगावकर यांनी वेळेवर या प्रकरणात लक्ष घातलं नाही तर २१ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय भोंडवे यांनी जाहीर केला आहे. हे अख्खं प्रकरण काय आहे ते समजून घेऊया.

दोन निवड चाचण्यांनंतर कुस्ती परिषदेनं महाराष्ट्राचा पुरुष आणि महिलाांचा संघ निवडला. खेळाडूंबरोबर १ संघव्यवस्थापक आणि ३ प्रशिक्षक यांची नावंही २५ ऑक्टोबरलाच निश्चित झाली. या निवडीवर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचं आवश्यक शिक्कामोर्तबही झालं. त्यानंतर निवडलेल्या खेळाडूंना किट देणं आणि त्यांची गोव्याला जायची आणि तिथे राहायची सोय करणं हे काम महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचं होतं. त्यांना खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची नावं कळवण्यात आली होती. पण, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या कामी अक्षम्य हलगर्जी केल्याचा आरोप भोंडवे यांनी केला आहे. इतकंच नाही तर जाणून बुजून हे करण्यात आल्याचंही त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. (National Games Kusti Team)

‘खेळाडूंना दुसऱ्या दिवशी पहाटे विमान असताना आदल्या दिवशीपर्यंत किट मिळाली नव्हती. शिवाय कितीचं विमान पकडायचं आहे याचीही माहिती खेळाडूंना देण्यात आली नव्हती. दोन पदाधिकाऱ्यांना तर शेवटपर्यंत ही माहिती देण्यात आली नाही. किरण मोरे आणि मोहन खोपडे हे प्रशिक्षक इतरांकडून माहिती घेऊन पहाटे विमानतळावर पोहोचले तर त्यांचं विमान तिकीटच रद्द करण्यात आलं होतं,’ असं भोंडवे यांनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे. इतकंच नाही तर हा गोंधळ निस्तारून ते गोव्याला पोहोचले तर तिथे हॉटेलमध्ये त्यांच्या जागी दुसरेच दोन लोक संघाचे व्यवस्थापक म्हणून जागा अडवून बसले होते. शेवटी आधीपासून झालेली नियुक्ती आणि त्यावर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची परवानगी यामुळे खोपडे आणि मोरे यांना संघाबरोबर राहता आलं.

(हेही वाचा : Black Day : बेळगावात काळा दिवस, महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी)

हा सावळागोंधळ तर झालाच. आता तो हेतुपुरस्सर करण्यात आल्याचं भोंडवे यांचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे परस्पर हितसंबंध जबाबदार असल्याचा त्यांचा दावा आहे. ‘कुंपणच शेत खातं अशी ही परिस्थिती आहे. आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या या वागण्यामुळे राज्यातील खेळांचं नुकसान होत आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष दादासाहेब लांडगे यांच्या आशीर्वादाने हे होत आहे.’ असा थेट आरोप भोंडवे यांनी या पत्रकात केला आहे. पैलवान योगेश दोडके यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडे पूर्वीच तक्रार केली आहे. तेव्हा तिच्या आधारे या प्रकाराची चौकशी व्हावी आणि असे प्रकार बंद व्हावेत अशी मागणी भाजप क्रीडा आघाडीने केली आहे. कारवाई न झाल्यास २१ नोव्हेंबरपासून जिल्हा पातळीवर आंदोलनं सुरू करून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. खेळाडूंनी वेळेवर किट का नाही मिळाली, त्यांना वेळेवर गोव्याला पाठवण्याचा निर्णय आणि तशी सोय का झाली नाही, दोन पदाधिकाऱ्यांना ऐन वेळी का डावललं, या पदाधिकाऱ्यांऐवजी दोन भलत्याच अधिकाऱ्यांना गोव्याला कुणी पाठवलं? त्यांची नावं कशी समोर आली? असे प्रश्न महाराष्ट्र असोसिएशनला विचारण्यात आले आहेत. आणि चौकशी करून या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आवाहन पत्रकात करण्यात आलं आहे.दरम्यान हिंदुस्थान पोस्टने या प्रकरणी महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.