महाराष्ट्रात जन्म झालेल्या ‘मल्लखांब’चा शासनमान्य खेळांच्या यादीत समावेश नाही; खेळाडूंचे भविष्य अधांतरी

महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये मल्लखांब खेळाला विशेष महत्त्व दिले जात आहे.

328
महाराष्ट्रात जन्म झालेल्या 'मल्लखांब'चा शासनमान्य खेळांच्या यादीत समावेश नाही; खेळाडूंचे भविष्य अधांतरी

‘मल्लखांब’ या खेळाला जिम्नॅस्टिकची जननी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या मातीत या खेळाचा जन्म झाला. मात्र, जन्मभूमीतच या खेळाला राजाश्रय नसल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या शासनमान्य खेळांच्या यादीत ‘मल्लखांब’चा समावेश नसल्यामुळे खेळाडूंना हक्काच्या सवलतींपासून वंचित रहावे लागत आहे.

कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे मल्लखांब खेळाचे वर्णन केले जाते. या खेळाचा जन्म महाराष्ट्रात झाला असला, तरी महाराष्ट्र सरकार त्याविषयी फारच उदासीन असल्याचे दिसून येत आहे. कारण, या खेळाचा अद्याप शासनमान्य खेळांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे खेळाडू आरक्षणांतंर्गत मिळणाऱ्या नोकरीसह अन्य सवलतींपासून राज्यातले मल्लखांबपटू वंचित राहत आहेत.

महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये मल्लखांब खेळाला विशेष महत्त्व दिले जात आहे. मध्य प्रदेशने तर मल्लखांबला राज्य खेळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर खेळल्यानंतर तेथील खेळाडूंना नोकरी आणि इतर सवलतीही मिळतात. महाराष्ट्रातील खेळाडूंना मात्र अशा कोणत्याही सवलती मिळत नाहीत, अशी खंत प्रसिद्ध मल्लखांबपटू हिमानी परब हिने व्यक्त केली.

दरम्यान, खासदार राहुल शेवाळे आणि महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर क्रीडा विभागाने गांभीर्य लक्षात घेऊन मल्लखांबचा शासनमान्य खेळांच्या यादीत समावेश करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्याचे कळते. बुधवार, २७ जून रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे.

(हेही वाचा – थकबाकीदारांवर राज्य सरकार मेहरबान; क्रिकेट सामन्यांच्या बंदोबस्त शुल्कात ६० टक्क्यांची कपात)

राष्ट्रीय पुरस्कार मिळवले तरी अपात्र

हिमानी परब हिने मल्लखांब खेळात मिळवलेल्या विशेष प्राविण्याबद्दल २०१६ मध्ये शिवछत्रपती पुरस्कार आणि २०२१ ला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मल्लखांबमध्ये ती वर्ल्ड चॅम्पियन राहिली आहे. मात्र, राज्य सरकारच्या यादीत या खेळाचा समावेश नसल्यामुळे ती खेळाडू आरक्षणांतंर्गत नोकरीसाठी पात्र ठरत नाही, ही गंभीर बाब आहे. याकडे आम्ही केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. लवकरच सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली.

‘मल्लखांब’साठी धोक्याची घंटा

महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये मल्लखांबपटूंना नोकरी आणि इतर सवलती मिळतात. महाराष्ट्रातील खेळाडूंना मात्र अशा कोणत्याही सवलती मिळत नाहीत. त्यामुळे मल्लखांबमध्ये भविष्यात करिअर नसल्यामुळे दुसऱ्या कोणत्या तरी क्षेत्राची निवड करूया, अशी भावना खेळाडूंमध्ये अलीकडे वाढीस लागली आहे. परिणामी, या खेळाकडे मुलांचा ओढा कमी होत आहे. मल्लखांबसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे, की त्यांनी मल्लखांब हा खेळ शासनमान्य खेळांच्या यादीवर घ्यावा, अशी मागणी मल्लखांबपटू हिमानी परब हिने केली.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.