-
ऋजुता लुकतुके
महाराष्ट्राची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने (Malvika Bansod) भारतीय बॅडमिंटनमध्ये नवा इतिहास रचला आहे. ताज्या क्रमवारीत ती २३ व्या क्रमांकावर आहे. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्यानंतर अव्वल २५ जणींमध्ये स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या ऑल इंग्लंड ओपन या प्रतीष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्य फेरीत मजल मारल्यामुळे मालविकाला ४.८०० गुण मिळाले आणि त्याच्या जोरावर ती २८ व्या क्रमांकावरून थेट २३ व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
‘हा माझ्या कारकीर्दीतील एक आनंदाचा क्षण आहे आणि इथपर्यंत मजल मारण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आहेत. माझे प्रशिक्षक पालक या सगळ्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे. इथून खूप मोठी मजल मारायची आहे. पण, चांगल्या सुरुवातीमुळे मला आत्मविश्वास मिळाला आहे,’ असं मालविका (Malvika Bansod) या कामगिरीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाली. ऑल इंग्लंड या महत्त्वाच्या स्पर्धेत तिने जपानी खेळाडू एकने यामागुचीला हरवलं होतं.
(हेही वाचा – Disha Salian मृत्यू प्रकरणाचे पडसाद विधानसभेत; Aaditya Thackeray यांच्या अटकेची जोरदार मागणी)
मालविका (Malvika Bansod) क्रमवारीत आगेकूच करत असताना भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ऑल इंग्लंड स्पर्धेत पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडली. त्यामुळे तिची घसरण होऊन ती सतराव्या क्रमांकावर घसरली आहे. सिंधू आणि मालिवका या सध्याच्या आघाडीच्या भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहेत. त्यानंतर अनुपमा उपाध्याय (४३), रक्षिता श्री (४५), आकर्षी कश्यप (४८) यांचा क्रमांक लागतो. या पाच महिला बॅडमिंटनपटू सध्या पहिल्या पन्नासात आहेत.
आता स्वीस ओपन स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि या स्पर्धेत दोघींचा ड्रॉ समान आहे. त्यामुळे दोघींनी आपापले पहिले दोन सामने जिंकले तर उपउपांत्य फेरीत दोघी आमने सामने येऊ शकतील. तसं झालं तर भारतीय बॅडमिंटनमधील दोन पिढ्यांचा मुकाबला ठरू शकेल. मालविकाचा (Malvika Bansod) पहिला सामना कॅनडाच्या मिचेल लीशी होणार आहे. यापूर्वी मिचेलने एकदा मालविकाला हरवलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community