Manu Bhaker : एकाच ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय ॲथलीट

Manu Bhaker : वैयक्तिक कांस्य पदकासह मनूने सरबज्योतच्या साथीने मिश्र सांघिक स्पर्धेतही कांस्य जिंकलं.

138
Manu Bhaker : एकाच ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय ॲथलीट
  • ऋजुता लुकतुके

२२ वर्षीय मनू भाकेरसाठी हे ऑलिम्पिक स्वप्नवत ठरलंय. आपल्या लागोपाठ दुसऱ्या स्पर्धेत आणखी एक कांस्य पदक जिंकत मनूने इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय ॲथलीट ठरली आहे. दोनच दिवसांपूर्वी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात तिने वैयक्तिक स्पर्धेत कांस्य जिंकलं होतं. आता पाठोपाठ यात प्रकारात मिश्र सांघिक कांस्यही तिने आपल्या नावावर केलं आहे. सरबज्योतच्या साथीने तिने कोरियन जोडीला १६-१० असं हरवलं. (Manu Bhaker)

विशेष म्हणजे मनू या ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट ट्रीकही साधू शकते. कारण तिची २५ मीटर एअर पिस्तुलची स्पर्धा अजून बाकी आहे. या प्रकारात ती ईशा सिंगबरोबर खेळणार आहे. मंगळवारच्या कामगिरीनंतर मनूने अनेक ऑलिम्पिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आणि हे विक्रम रचणारी ती पहिली भारतीय ठरणार आहे. (Manu Bhaker)

  • २० वर्षांनंतर ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे (यापूर्वी सुमा शिरुरने २००४ मध्ये अंतिम फेरी गाठली होती)
  • ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज
  • एअर पिस्तुल प्रकारात पदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज
  • एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली खेळाडू
  • दोन ऑलिम्पिक पदकं मिळवणारी पहिली भारतीय नेमबाज
  • सांघिक प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज (सरबज्योत सह)
  • वैयक्तिक आणि सांघिक अशा दोनही प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : ‘या’ रशियन ॲथलीट रशियाकडून न खेळता, इतर देशांकडून का खेळत आहेत?)

पी व्ही सिंधूने यापूर्वी दोन ऑलिम्पिक पदकं मिळवली होती. पण, ती दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये मिळालेली होती. आपलं दुसरं कांस्य पदक जिंकल्यानंतरही मनू आधी सारखीच शांत होती. टोकयो ऑलिम्पिकमध्ये तिचं पिस्तुल बिघडल्यामुळे तिला २५ मीटर स्पर्धेची अंतिम फेरी अर्धवट सोडावी लागली होती. तेव्हापासून टोकयोचं अपयश मागे टाकत मनूने ही प्रगती केली आहे. (Manu Bhaker)

टोकयोपासून ते पॅरिसपर्यंतच्या प्रवासाबद्दल मनू अगदी मोकळेपणाने बोलली. ‘टोकयोतलं अपयश तेव्हा जिव्हारी लागलं होतं. आणि तेव्हा जे जे घडलं ते खूप दिवस मनात राहिलं. त्या अपयशातून बाहेर पडायला दिवसही खूप गेले. पण, जेव्हा मी ते अपयश स्वीकारलं, त्यानंतर मी अधिक कणखर झाले. पॅरिसमध्ये काय करायंच ते पक्कं ठरवलं होतं. मनाची एकाग्रता वाढवली आणि यश मिळवायचा निर्धार केला,’ असं मनू भाकेर पॅरिसमधील यशाबद्दल बोलताना म्हणाली. (Manu Bhaker)

टोकयो आता मागे पडलंय. आताच्या घडीत जगत आहे, त्यानेच मनाला सकारात्मकता येते, असं तिचं वारंवार सांगणं आहे. मनूच्या साथीने सरबज्योतसाठीही ही अंतिम फेरी महत्त्वाची होती. वैयक्तिक स्पर्धेत त्याची अंतिम फेरी थोडक्यात हुकली होती. पण, ती कसर त्याने या पदकाने भरून काढली. (Manu Bhaker)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.