राज ठाकरेंची सभा झालेली जागा ‘या’ खेळासाठी आहे प्रसिद्ध

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली आणि औरंगाबादचं मराठवाडा सांस्कृतिक मैदान हे पुन्हा एकदा चर्चेत आला. याच मैदानावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या देखील सभेची घोषणा करण्यात आली आहे.

त्यामुळे मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाप्रमाणेच आता या मैदानाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पण या मैदानाला देखील मोठा इतिहास आहे. या मैदानाजवळ असलेल्या जागेतून अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे.

(हेही वाचाः राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार)

जिमनॅस्टिक्ससाठी प्रसिद्ध

ज्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली त्या शेजारीच एक शारीरिक शिक्षण महाविद्यालय(Physical Education College)आहे. या महाविद्यालयातील जागी मराठवाडा सांस्कृतिक मंडळातर्फे जिमनॅस्टिक्स, व्हॉलिबॉल आणि इतर खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे या मैदानात पोलिस किंवा सैन्यभरतीचे उमेदवारही शारीरिक प्रशिक्षणासाठी येत असतात. जिमनॅस्टिक्स या खेळ प्रकारात या जागेतील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. अशी माहिती छत्रपती पुरस्कार विजेते विवेक देशपांडे यांनी दिली आहे.

छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू

मराठवाडा सांस्कृतिक मंडळातून प्रशिक्षण घेतलेल्या 22 ते 23 खेळाडूंना क्रीडा प्रकारातील छत्रपती पुरस्काराने राज्य सरकारकडून सन्मानितस करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 50 ते 70 आंतरराष्ट्रीय खेळाडू येथून प्रशिक्षण घेत आहेत. सुधीर जोशी यांनी येथे जिमनॅस्टिक्स हा खेळ प्रकार सुरू केला. त्यानंतर त्यांचे चिरंजीव मकरंद जोशी आणि संकर्षण जोशी यांच्या प्रयत्नाने हा खेळ प्रकार येथे विकसित झाला.

(हेही वाचाः राज ठाकरेंच्या दाव्याला पुष्टी, मशिदींवरील भोंग्यांबाबत हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिमांच्या तक्रारी)

वर्ल्ड चँपियनशिपसाठी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

याच मंडळातून प्रशिक्षण घेतलेले तीन पंच जिमनॅस्टिक्स या खेळ प्रकारासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पंचांची भूमिका निभावणार आहेत. तसेच भारताच्या जिमनॅस्टिक्स संघातील 8 खेळाडू याच मंडळाच्या जागेत प्रशिक्षण घेत आहेत. हे खेळाडू आता वर्ल्ड चँपियनशिपसाठी भारतीय संघातर्फे जाणार आहेत. तसेच राष्ट्रीय पातळीवर एरोबिक्स जिमनॅस्टिक्समध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या संघाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्यामुळे या जागेला जिमनॅस्टिक्सचा फार मोठा वारसा आहे, असेही विवेक देशपांडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांची सभा झालेल्या मैदानात औरंगाबादमधील अनेक खेळाडू क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here