Mary Kom : ऑलिम्पिक संघटना आपलं ऐकत नसल्याचा मेरी कोमचा आरोप

Mary Kom : मुष्टियुद्ध प्रकारात भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकही पदक मिळालं नाही. 

110
Mary Kom : ऑलिम्पिक संघटना आपलं ऐकत नसल्याचा मेरी कोमचा आरोप
  • ऋजुता लुकतुके

भारताची दिग्गज मुष्टीयोद्धा मेरी कोमने (Mary Kom) तिचं म्हणणं ऐकलं जात नसल्याची तक्रार केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मुष्टीयुद्धात एकही पदक मिळवता आलेलं नाही. यावर भाष्य करताना मेरी कोम म्हणते, ‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन माझं म्हणणं ऐकूनही घेत नाही. मी खेळाडूंच्या असोसिएशनची अध्यक्ष असूनही माझं ऐकलं जात नाही. मग इतरांची काय अवस्था असेल. त्यामुळे मी हल्ली सल्ला देणंच सोडलं आहे,’ असं मेरी कोम एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना म्हणाली.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने नोव्हेंबर २०२२ मध्ये दहा खेळाडूंची एक समिती स्थापन केली आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राचा विकास हे यामागचं उद्दिष्ट आहे. पण, सध्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या सदस्यांमध्येच बेबनाव आहे. अध्यक्ष म्हणून पी. टी. उषा यांना कार्याकारिणीतील काही सदस्यांचा विरोध आहे. खासकरून सीईओची नियुक्ती रखडल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची नाराजीही भारताने ओढवून घेतली आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय परिषदेनं ऑलिम्पिक आयोजनातून मिळणाऱ्या निधीचा वाटा भारताला दिला नाही. तो रोखून धरण्यात आला आहे.

(हेही वाचा – Assembly Elections : मार्चच्या परीक्षेत नापास, ऑक्टोबरमध्ये पुन्हा संधी; विधानसभेसोबत नांदेड लोकसभेचा धुराळा)

अशावेळी मेरी कोमनेही (Mary Kom) ऑलिम्पिक असोसिएशनबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘मी ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीत सक्रिय नाही. पण, मला काही मतं आहेत. माझा आवाज आहे. पण, ते ऐकूनच घेत नाहीत. अनेकदा मी लेखी सूचनाही केल्या आहेत. पण, त्या ऐकूनच घेतल्या जात नाहीत. मला राजकारण कळत नाही. आणि माझा त्याच्याशी संबंधही नाही. मला कोणाला नावं ठेवायची नाहीत. पण, आता मी सल्ले द्यायचं थांबवलं आहे,’ असं मेरी कोम पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली.

इतकंच नाही तर मुष्टियुद्ध फेडरेशनमध्येही तिचं म्हणणं कुणी विचारात घेतलं नाही असाही मेरी कोमचा आरोप आहे. ‘माझ्या अनुभवाचा फायदा नवीन मुष्टियोद्ध्यांना होऊ शकला असता. मी त्यासाठी तयार होते. पण, त्यांना तशी गरजच वाटली नाही. मला एकदाही त्यांनी शिबिरासाठी बोलावलं नाही. त्यामुळे आता झालेल्या खराब कामगिरीबद्दलही मी बोलू इच्छित नाही,’ असं मेरी म्हणाली. मेरी कोमने (Mary Kom) ४८ किलो वजनी गटात विक्रमी ६ विश्वविजेतेपदं पटकावली आहेत. तर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने ५० किलो गटात कांस्य जिंकलं होतं. जागतिक स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करायची असेल तर आधी प्रशिक्षकांमध्ये बदल घडवावे लागतील असं मेरीने म्हटलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.