ऋजुता लुकतुके
अखिल भारतीय फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी नुकतंच एक धक्कादायक सत्य उघड केलं आहे. आयलीग या देशांतर्गत फुटबॉल लीग दरम्यान काही लोकांनी एकत्र येऊन सामन्याच्या निकालावर प्रभाव टाकतील अशा कारवाया केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि या प्रकरणी फुटबॉल फेडरेशनने चौकशी सुरू केल्याचंही चौबे यांनी सांगितलं आहे.
पण, खेळाडूंचा यात नेमका किती सहभाग होता, नेमका कुणी खेळाडूंशी संपर्क केला, याविषयीची माहिती देण्याचं मात्र चौबे यांनी टाळलं. भारतीय फुटबॉलमध्ये भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं. ‘ज्या घटनांची माहिती मिळाली आहे, त्यांचा सखोल तपास करू आणि चौकशी अंती दोषींवर कठोर कारवाई करू,’ असं चौबे यांनी अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. पण, नेमकं काय घडलं हे त्यांनी सांगितलेलं नाही.
(हेही वाचा-Joshimath : पुनर्निर्माणाला केंद्र सरकारची मंजुरी)
यंदाचा आयलीग कार्यक्रम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाला होता आणि १३ संघ असलेल्या या स्पर्धेत ४० सामने खेळवण्यात आले. यातील कुठल्या सामन्यांची चौकशी होणार हे अजून स्पष्ट नाही.
पण, यापूर्वी अनेकदा भारतीय देशांतर्गत फुटबॉल संघांवर भ्रष्टाचाराचे आणि मॅच फिक्सिंचे आरोप झाले आहेत. फुटबॉल फेडरेशननेच २०१८ साली एक रॅकेट उघड केलं होतं आणि यात मिनर्व्हा पंजाब फुटबॉल क्लबच्या काही खेळाडूंना फिक्सिंगसाठी संपर्क करण्यात आला होता.
पुढच्याच हंगामात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या धडक कारवाईत फुटबॉलमधील आणखी काही प्रकरणं उघड झाली होती आणि या घटनांची चौकशी सीबीआयनेच केली होती. एका दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सिंगापूरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीवर सीबीआयची नजर गेली. आणि ही व्यक्ती आयलीगमधील संघांच्या आणि खेळाडूंच्या संपर्कात असल्याचं सीबीआयच्या निदर्शनास आलं. या व्यक्तीने काही खेळाडूंशी मॅच फिक्सिंगसाठी संपर्क वाढवला होता. तसंच सामन्यादरम्यान ही व्यक्ती स्पॉट फिक्सिंगही करायची. सीबीआयने या घटनेनंतर अख्ख्या आयलीगचा ढाचा आणि अशा प्रकारात सहभाग असल्याचा संशय असलेले खेळाडू आणि प्रशासकीय वर्ग यांची चौकशी केली होती.
(हेही पाहा-https://www.youtube.com/watch?v=0_ctu_EWhMQ&t=90s)
Join Our WhatsApp Community