इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांना शनिवारपासून सुरुवात होणार असून यातील काही सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळले जाणार आहे. या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका परिपत्रकामुळे गोंधळ निर्माण झाला होता, व्हायरल झालेल्या पत्रकात एटीएसने अटक केलेल्या एका अतिरेक्याच्या चौकशीत आयपीएल सामने अतिरेक्यांच्या टार्गेटवर असल्याचे म्हटले होते. ही गोपनीय माहिती अटकेत असलेल्या एका अतिरेक्याने दिल्याचे म्हटले होते.
( हेही वाचा : आता रेल्वे प्रवासात जेवणाचे नो टेन्शन! २ एप्रिलपासून ही सुविधा सुरू )
मात्र असे कुठलेही पत्रक अथवा गोपनीय माहिती एटीएसने पोलीस विभागाला दिली नसल्याचे समोर आले आहे. याबाबत गृहमंत्रालयाकडून खुलासा देण्यात आलेला असून त्यात वानखेडे स्टेडियम अथवा हॉटेलची अतिरेक्यांकडून कुठल्याही प्रकारची रेकी करण्यात आलेली नसल्याचा खुलासा गृह मंत्रालयाकडून करण्यात आलेला आहे.
मुंबई पोलिसांकडून सुरक्षा
आयपीएल क्रिकेट सामने होणाऱ्या मैदानांबाहेर सुरक्षा पुरवणे, खेळाडूंना सुरक्षा बंदोबस्त पुरविणे हे सुरक्षा यंत्रणेचे काम आहे, या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेणे सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी असल्याचे गृहविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एटीएसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलिकडे आम्ही कुठल्याही अतिरेक्याला अटक केलेली नाही, त्यामुळे या ठिकाणची अतिरेक्यांकडून रेकी करण्यात आली अशी माहिती एटीएसकडून सुरक्षा यंत्रणेला देण्यात आली नसल्याचे एटीएसचे म्हणणे आहे. त्याचसोबत मुंबई पोलिसांकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रात मुंबई पोलिसांनी असे म्हटले आहे की, आयपीएल क्रिकेटचे सामने मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉने स्टेडीयम येथील मैदानावर २६ मार्च पासून सुरु होत आहेत.
आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी मैदानावर तसेच हॉटेल्सवर मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येत आहे. अतिरेक्यांकडुन हॉटेल ट्रायडेंट, वानखेडे स्टेडीयम, हॉटेल ट्रायडेंट ते वानखेडे स्टेडीयमपर्यंतच्या मार्गाची रेकी झाल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून इनपुट किंवा माहिती प्राप्त झालेली नाही. तरी आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान स्टेडियमवर, हॉटेलवर आणि मार्गावर पुरेसा सुरक्षा बंदोबस्त मुंबई पोलिसांकडून पुरविण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community