अॅथलेटिक ट्रॅक झाले नेत्यांच्या गाड्यांचे वाहनतळ!

मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा चक्क मुख्य अॅथलेटिक्स स्टेडियमच्या ट्रॅकवर उभा करण्यात आला होता.

205

सध्या ऑलिम्पिकचे वारे वाहू लागले आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करणा-या खेळाडूंना नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मधून सुभेच्छा दिल्या. तसेच देशाने खेळाडूंच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे सांगितले. आधीच खेळाडूंना सरावासाठी मैदानं उपलब्ध नसताना, आता पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बालेवाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री अदिती तटकरे दाखल झाले होते. तेव्हा त्यांच्या गाड्यांचा ताफा चक्क मुख्य अॅथलेटिक्स स्टेडियमच्या ट्रॅकवर उभा करण्यात आला होता.

5 कोटींचा ट्रॅक

शासकीय क्रीडा अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे हा प्रताप घडून आल्याने, क्रीडा क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात सुमारे 5 कोटी रुपये खर्च करुन, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारला आहे. पण, या ट्रॅकवरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या गाड्या उभ्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

(हेही वाचाः पुण्यात सोमवारपासून पुन्हा निर्बंध! कसे आहेत नियम?)

काय झाले नेमके?

सुमारे 5 कोटी रुपये खर्च करुन हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारला गेला आहे. खेळाडूंच्या सरावा व्यतिरिक्त इथं पायी चालण्याचीही परवानगी नसते. हे माहीत असून देखील, आलेल्या मंत्र्यांचे दोन मजले चढण्याचे श्रम वाचावे आणि आपल्याला शाबासकी मिळावी, यासाठी क्रीडा अधिकाऱ्यांनी केलेल्या या करामतीमुळे क्रीडा विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

काय म्हणाले क्रीडामंत्री? 

या आधी आजी-माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय क्रीडा मंत्री अनेकांनी शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मुख्य अॅथलेटिक्स स्टेडियमला भेट दिली आहे. मात्र, कोणीच अॅथलेटिक्स ट्रॅकवर VIP गाड्या पार्क केल्या नव्हत्या. याबाबत क्रीडा संकुलातील क्रीडा अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी हात वर केले. मात्र, क्रीडामंत्री सुनील केदार यांनी ह्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली. क्रीडांगणाचा वापर राजकीय कार्यक्रम, समारंभासाठी न होता ते खेळासाठीच वापरले जातील. मात्र हे सगळं क्रीडा विद्यापीठ सुरू झाल्यावर होईल, असं केदार यांनी सांगितलं.

(हेही वाचाः गरज सरो, एसटी मरो!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.